आ.शेळकेंची स्ट्रॅटेजी कामी आली,त्यांच्या चार समर्थकांना कारखान्यावर संचालक म्हणून संधी मिळाली

अजितदादांमुळे कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः खेड,शिरूर,मावळ,मुळशी,हवेली तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कासारसाई (ता.मुळशी) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ५ एप्रिलला होणार आहे.कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आणि शरद पवार यांचे समर्थक नानासाहेब नवले यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अपवाद वगळता बिनविरोध झालेली आहे.दरम्यान,राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांचा गट व त्यातही त्यांचे मावळचे आमदार सुनील शेळके हे यावेळी आपले बंधू सुधाकर व इतर समर्थकांसह या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने ती यावेळी बिनविरोध होईल की नाही,अशी चर्चा सुरु झाली होती.पण, ती बिनविरोध करण्याच्या दृष्टीने अजितदादांनी काल रात्री एक पाऊल पुढे टाकत सर्वपक्षीय पॅनेल तयार केले.ते करताना आ.शेळकेंनी आपल्या बंधूंसह माघार घेतली असली,तरी आपल्या चार समर्थकांना निवडणुकीत संधी मिळवून दिली.त्याव्दारे त्यांचा कारखान्यातही प्रवेश होणार आहे.त्यांची अर्ज दाखल करण्याची खेळी यशस्वी झाली.

तीन दिवसांपूर्वीच स्थानिक शिवसेना खासदार मावळचे श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.निवडणूक बिनविरोध करण्यावर त्यात सहमती झाली.कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली ती पार पडेल,असे तीत ठरले होते.नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी सर्वसामान्य सभासदांची इच्छा आहे.असे आ.शेळके त्यावेळी म्हणाले होते.सर्व काही तसेच आज घडले.अनेक नवे चेहरे संचालक म्हणून निवडणुकीत उतरले आहेत.नवले यांच्या नेतृत्वातच आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढण्याचे आता ठरले.काल रात्री मुंबईत अजितदादांच्या बंगल्यावर तसा निर्णय झाला. तो सकाळी अंमलात आला.त्यानुसार शेळके बंधूंनी आपले अर्ज मागे घेतले.त्याऐवजी त्यांचे समर्थक छबुराव कड,रमेश बोडके,भरत निम्हण आणि शोभा वाघोले यांच्यासह माऊली दाभाडे यांना मैदानात उतरवले.माजी मंत्री भाजपचे बाळा भेगडे यांचे समर्थक संदीप काशीद व गेल्या विधानसभेला त्यांनी पुरस्कृत केलेले उमेदवार आणि कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांना संधी देण्यात आली.चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगतापांचे पाठीराखे म्हणून रावेतचे धोंडिबा भोंडवे,तर त्यांच्याच पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंचे समर्थक अतुल काळजे यांचा सर्वपक्षी. श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलमध्ये समावेश केला गेला.दरम्यान,सर्वपक्षीयांचे पॅनेल असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी,असे आवाहन अजितदादा आणि नानासाहेब नवले यांच्या वतीने राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा निरीक्षक सुरेश घुले यांनी केले आहे.

आ. शेळके प्रथमच या कारखान्याच्या निवडणुकीत उतरल्याने तीत मोठी रंगत आणि चुरस निर्माण झाली होती..त्यांच्यासह माऊली कटके (शिरूर)आणि शंकर मांडेकर (मुळशी-वेल्हा-भोर)असे तीन आमदार कारखाना कार्यक्षेत्रात यावेळी असल्याने अजित पवारांना या निवडणुकीत मोठी ताकद होती..त्यामुळे त्यांनी ठरवले,असते,तर ही निवडणूक झाली असती.पण,त्यांनी आपली मोठी ताकद असूनही एक पाऊल मागे घेतले. नवलेंच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान ठेवला.त्यांच्याच नेतृत्वात लढण्याचे मान्य केले महायुतीच नाही,तर महाविकास आघाडीलाही पॅनेलमध्ये स्थान देत त्याला सर्वपक्षीय स्वरुप दिले.त्यामुळे नवलेच पुन्हा अध्यक्ष होणार हे अधोरेखित झाले.तसेच विधानसभेला पराभूत झालेले बापूसाहेब भेगडे यांचा कारखान्यावर बिनविरोध निवडून जाण्याचा मार्गही मोकळा झाला.त्यातून त्यांचा शेळकेंशी पु्न्हा होणारा राजकीय संघर्ष टळला.