उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी)पुणे युनिट पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आले आहे.त्यांनी गेल्या दहा दिवसांत चार ट्रॅप पुणे शहरात केले.त्यातून पुणे शहरात लाचखोरी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.दोन ट्रॅप बंडगार्डन या एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.सोमवारी (ता.१०) त्यांनी पुण्यातील शिरुर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून सुजाता मनोहर बडदे यांना तानाजी श्रीपती मारणे (वय ४६, रा.इंदिरानगर,पुणे) या खासगी व्यक्तीमार्फत (मध्यस्थ तथा दलाल)एक लाख साठ हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
बडदेंविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ डिसेंबरला चारशे रुपयांची लाच स्वीकारलेल्या हवेली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या सेतू कार्यालयातील वंदना दिनेश शिंदे (वय ५०)आणि जयश्री रोहिदास पवार (वय ५०) या ऑपरेटरना पकडण्यात आले होते. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार त्यांनी केला. एका भुमिहीनाला तो भुमिहीन असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली होती. त्यानंतर ४ दिवसांतच येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जीएसटी कार्यालयातील निरीक्षक तुषारकुमार दत्तात्रेय माळी (वय३३) याला पाच हजार रुपये लाच घेताना अटक झाली.त्याच्या दुसऱ्याच दिवशी सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेल्हे तालुक्यातील वरघड गावच्या सरपंच सुवर्णा नथुराम डोईफोडे यांचे पती नथुराम कोंडिबा डोईफ़ोडे (वय ३२,रा.धायरी,पुणे) आणि वेल्ह्यातीलच गिवशी आंबेगावचे सरपंच बाळासाहेब धावू मरगळे (वय ३३,रा.किरकिटवाडी) यांना १६ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.
ताज्या घटनेत बडदे यांनी पहिल्यांदा चार लाख रुपये लाच मागितली.नंतर,तीन लाख वीस हजारावर तडजोड केली.त्यातील निम्म्या रक्कमेचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना अटक झाली.इथेही त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यातील अगोदरच्या लाचखोरीच्या गुन्ह्यातील दोन्ही महिला आरोपींसारखाच प्रकार केला.टेमघर धऱणात जमिन गेलेल्या शेतकऱ्याकडून ही लाच बडदेंनी घेतली.टेमघर धऱणात जमिन संपादन झालेल्या या शेतकरी तक्रारदाराला व त्याच्या भावाला शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे शेतजमिन व घरासाठी दोन गुंठे जागा सरकारने दिली होती.त्यासाठी या दोघांच्या कुटंबातील आठ सदस्यांचे प्रस्ताव बडदेंकडे प्रलंबित होते. प्रत्येक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी त्यांनी पन्नास रुपये असे एकूण चार लाख रुपये लाच म्हणून मागितले.नंतर चाळीस हजार हा दर त्यांनी प्रत्येक प्रस्तावासाठी नक्की केला.ती मारणेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार त्याला तीन लाख वीस हजार रुपयांच्या लाचेतील निम्मी रक्कम पहिला हप्ता म्हणून घेताना अटक आज करण्यात आली.त्यानंतर बडदेंनाही ताब्यात घेण्यात आले.एसीबीचे पोलिस निरीक्षक (पीआय) अमोल भोसले पुढील तपास करीत आहेत.

