आत्महत्या केलेल्या मोरे महाराजाचं ३२ लाखांचे कर्ज फेडलं
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः३२ लाखांचं कर्ज झाल्याने संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध किर्तनकार, प्रखर हिंदुत्ववादी व्याख्याते शिरीष महाराज मोरे (वय ३२,रा.देहू,ता.हवेली,जि.पुणे)यांनी ५ फेब्रुवारीला राहत्या घरी आज पहाटे उपरण्याने गळफास घेत आत्महत्या केली.त्यांचा दशक्रियाविधी होण्याच्या आत त्यांचा म्हणजे मोरे कुटुंबावरील हा कर्जाचा डोंगर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता.९) उतरवला.त्यांनी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना देहूला पाठवून ही रक्कम शिरीष महाराजांच्या कुटुंबाला दिली.
वरील घटनेतून शिंदे यांच्या दातृत्व आणि संवेदनशीलतेचा दीड महिन्यात दुसऱ्यांदा प्रत्यय आला. गेल्या वर्षाच्या शेवटी २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी राजगुरुनगर (ता.खेड) येथे दोन अल्पवयीन सख्या बहिणींची अजय दास या परप्रांतियाने निर्घूण हत्या केली.त्यापूर्वी त्याने एका मुलीवर लैंगिक अत्याचारही केला.यामुळे उत्तर पुणे जिल्हा हादरून गेला होता.या मुलींचे वडिल मजूर असल्याने त्यांचे हातावर पोट आहे. त्यावेळी शिंदे जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर होते.त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचे उपनेते आणि स्थानिक माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राजगुरुनगरला पाठवून त्यांच्या हस्ते बळी गेलेल्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची रोख मदत दिली होती.त्यानंतर कालही त्यांनी अशाच पद्धतीने कर्जबाजारी मोरे कुटुंबाला मदतीचा हात दिला.आपल्या वाढदिवशी भेट दिली. वाढदिवस असल्याने ते येऊ शकले नाहीत. पण, आपल्या विश्वासू माणसामार्फत मोरे कुटंबाचे सर्व कर्ज फेडले.
कर्ज झाल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी शिरीष महाराजांनी लिहून ठेवली होती.त्यात कुटुंबावरील कर्ज फेडण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याची दखल लगेच उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली.आईवडिलांच्या इच्छेखातर लग्नास तयार झालेल्या शिरीष महाराजांचा साखरपुडा नुकताच झाला होता.या महिन्याच्या २० तारखेला लग्न होते.पण,त्यापूर्वीच कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. काल त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेलेल्या आ.शिवतारेंनी प्रथम त्यांना आदरांजली वाहिली.संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे , पंढरपूर देवस्थान समितेचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, शिवसेना देहू शहर प्रमुख सुनिल हगवणे, मा. सरपंच कांतिलाल काळोखे, भाजप नेते राम गावडे, कुटुंब, नातेवाईक,देहूकर ग्रामस्थ उपस्थित होते. ही मदत नसून समाजसेवा करणाऱ्या शिरीष महाराजांच्या कार्यातून काहीसा उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे, असे आ. शिवतारे यासदंर्भात आपला आवाजशी बोलताना म्हणाले.तसेच त्यांनीच यासाठी मदतीचे आवाहन केले होते,याकडे त्यांनी लक्ष वेधले.
