पाणी वाचविणारे सयाजी शिंदे वृक्ष बचावसाठीही सरसावले..
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः१९८० च्या दशकात त्यावेळच्या उत्तरप्रदेशात (आताचे उत्तराखंड) कंत्राटदाराकडून होणारी वृक्षतोड रोखून पर्यावरण वाचविण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहूगुणा यांनी केलेले चिपको आंदोलन खूप गाजले.परिणामी हिमालयाच्या कुशीतील हजारो झाडांची कत्तल टळून पर्यावरणांचे संवर्धन अबाधित राहिले. या चिपको आंदोलनाला उजाळा रविवारी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीवर मिळाला.कारण या दोन्ही शहरांच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात बाणेर येथे हे आंदोलन झाले.

आजच्या उत्तराखंडमधील मंडल गावात १९७३ ला एक कंत्राटदार झाडे तोडण्य़ासाठी आला असतान बहूगुणा व सहकारी हे या झाडांना मिठी मारून बसले.धमकावले जाऊनही त्यांनी व त्यातही मोठ्या संख्येने असलेल्या महिल आंदोलकांनी ही झाडे तोडू दिली नव्हती. नंतर हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून प्रख्यात झाले. देशभर ते पसरले.त्यामुळे उत्तरप्रदेशच नाही,तर देशातील लाखो वृक्ष वाचले. हेच चिपको आंदोलन रविवारी बाणेर येथे मुळा पात्रात झाले.नदी आणि पर्यावरणप्रेमी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे तसेच पर्यावरणवादी आणि शैक्षणिक सुधारक सोनम वांगचुक यांनी त्याचे नेतृत्व केले.दोन्ही शहरातील काही हजार नदी आणि वृक्षप्रेमी त्यात सामील झाले. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीपात्रातील व लगतची झाडे तोडण्यास त्यांनी दोन्ही महापालिकांना मज्जाव केला. सयाजी शिंदेसह अनेक यावेळी झाडांना मिठी मारून ते बसले. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.जीवित नदी ,पुणे रिव्हायवल,रविराज काळे युथ फाउंडेशनने या चिपको आंदोलनासाठी पुढाकार घेतला.नंतर त्यात दोन्ही जुळ्या शहरातील ६० पेक्षा जास्त सामाजिक संस्था सहभागी झाल्या.

नदी मुळात सुंदर असल्याने तिला सुशोभिकरणाची गरज नसते,या शब्दांत शिंदे यांनी यावेळी शेकडो कोटी रुपये खर्चाच्या पुणे महापालिकेच्या मुळा,मुठा,तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या सुधार प्रकल्पाला विरोध केला.सुंदर नद्यांचे आपण प्रथम गटार करतो,नंतर सुशोभिकरणाचे नाटक करतो,असा हल्लाबोल त्यांनी केला. मुळात नद्यांचं गटार करणं थांबवलं पाहिजं,मग नदीसुधारचंही नाटक बंद केलं पाहिजे,असे ते म्हणाले.नद्यांत अशुद्ध पाणी का सोडलं जातं,असा सवाल त्यांनी यावेळी केला.नदीजवळील दुर्मिळ झाडे तोडली जाऊ नयेत असे सांगत
झाडे वाचवू,नदी वाचवू असे आवाहन त्यांनी केले.या झाडांना संरक्षण देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल करण्याचा डाव उधळून लावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले,असे रविराज काळे यांनी आपला आवाजला सांगितले.ठेकेदारांची घरे भरण्यासाठी नदी सुधार प्रकल्प असल्याचा आरोप त्यांनी केला.अगोदरच पात्रात राडारोडा टाकल्याने नद्या अरुंद झाल्या असून हे कमी म्हणून की काय सांडपाणीही नदीत सोडले जात असल्याने काही ठिकाणी त्या गटारगंगाच झाल्या आहेत.त्यामुळे तेथील जलचरांवर अगोदरच संक्रात आली असताना आता नदी सुधारच्या नावाखाली तेथील झाडांवरही ती येऊ घातल्याने हे आंदोलन हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.