सुट्टीच्या दिवशीही कुदळवाडीत महापालिकेचा मोठा हातोडा, ६०२ अवैध बांधकामे पाडली

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः कुदळवाडी,चिखलीतील २२२ भंगार दुकाने,गोदामांवर पिंपरी महापालिकेने शनिवारी (ता.८)हातोडा चालवला. आज रविवारची सुट्टी असूनही त्यांनी तेथेच त्यापेक्षा मोठी कारवाई करीत ६०७ बांधकामे पाडली. ६८ लाख ७८ हजार चौरस फूट अतिक्रमित क्षेत्र मोकळं केलं.त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या, हवापाणी प्रदूषित करणाऱ्या शहराच्या या भंगार मालाच्या बाजारपेठेने रविवारी काहीसा मोकळा श्वास घेतला.

काल ४२ एकर जागेतील १८ लाख ३६ हजार ५३२ चौरस फूट जागेत झालेलं अतिक्रमण हटविण्यात आलं.एवढी मोठी कारवाई प्रथमच शहरात झाली.त्यात आठशेपेक्षा जास्त कर्मचारी,अधिकारी सामील झाले.ती पुढेही सुरु राहील,असे काल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी सांगितले होते.त्यानुसार आज ती झाली. काल इतक्याच मनुष्यबळात आज तिप्पट दणका कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांना दिला.कालसारखीच सकाळीच मोठ्य़ा बंदोबस्तात ही कारवाई सुरु झाली. ती सायंकाळीच थांबली.

आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर आज हातोडा पडला.महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांनी तो चालवला.त्यांना पोलिसांची मोठी साथ मिळाली.पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता सुनिल बागवानी यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी ती १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटरच्या मदतीने केली. अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे,डॉ.शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याने त्यामध्ये ज्यांचे साहित्य किंवा मशिनरी असतील त्यांनी ती तात्काळ काढून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करावे,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्ररदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *