उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःदिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल काल (ता.८) लागला.आम आदमी पार्टीची (आप)११ वर्षाची सत्ता खालसा झाली. भाजप २७ वर्षानंतर सत्तेत आला.खरी लढत ही आप आणि भाजपमध्येच झाली.पण चर्चा झाली ती दोन्ही कॉंग्रेसची. कारण त्यांना एकही जागा मिळाली नाही.पण, कॉंग्रेसुमळे भाजप सत्तेत येण्यास हातभार लागला.दुसरीकडे पक्षाचा ताबा मिळाल्यानंतर अजित पवारांनी राज्याबाहेर लढलेल्या या पहिल्याच निवडणुकीत ते सपशेल अपयशी ठरले.
भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या.म्हणजे स्पष्ट बहूमत मिळवले.तर,उर्वरित सर्व २२ जागा आपच्या वाट्याला गेल्या. राष्ट्रवादीसह कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला.त्यांच्या हाती भोपळा आला. गेल्यावेळीही कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.तर,यावेळी प्रथमच लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या २३ च्या २३ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होण्याची नामुष्की आली.तरीही त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विजयाबद्दल भाजपचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.आपल्या पक्षाला दिल्लीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीतून खुप शिकायला मिळालं.अपयशाचं विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल,असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीला दिल्लीत फक्त ०.०३ टक्के एवढी नाममात्र मते मिळाली. २३ उमेदवारांच्या पारड्यात अवघी तीन हजार ६४ मते पडली.त्यांच्या काही उमेदवारांपेक्षा अपक्षांना जास्त मते मिळाली.काहींना पन्नास,तर काहींना शंभर मते पडली.बलीमारन मतदारसंघातील त्यांचे उमेदवार एम.डी.हारून यांना सर्वात कमी म्हणजे अवघी ३८,तर सर्वाधिक दीड हजार मते रतन त्यागी या उमेदवाराला मिळाली. त्यातून दिल्लीकरांनी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पक्षाला घरचा रस्ता दाखवला.तर,कॉंग्रेस पक्षाला दुसऱ्यांदा खाते न उघडता आल्याने त्यांचीही मोठी चर्चा झाली.त्यांच्या उमेदवारामुळे १६ ठिकाणी आपचा पराभव झाला. तेथील तिरंगी लढतीत जेवढ्या मताधिक्याने भाजप निवडून आली त्यापेक्षा जास्त मते तेथे कॉंग्रेसने घेतली.जर,या १६ जागा आपला मिळाल्या असत्या,तर काट्याची टक्कर झाली असती.भाजप ३२ वर आला असता आणि आपला ३८ जागा मिळून ते सत्तेतही आले असते.