उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःराज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालय इमारतीचे भुमीपूजन तीन दिवसांपूर्वी (ता.६) झाले.त्यावेळी या दोघांनी पोलिसांचे जोरात कान टोचले.पुण्यासारख्या वाहन तोडफोडीच्या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये झाल्या,तर पोलिसांना दिलेल्या सुविधा बंद करू,असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता.गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढून त्यांना मोक्का लावा, असे ते म्हणाले होते.त्याला ७२ तास होण्याच्या आत उद्योगनगरीत सात-आठ गाड्या शनिवारी (ता.८) रात्री चिखलीत फोडण्यात आल्या.त्यामुळे अजितदादा काय करणार,काय पाऊल उचलणार,याकडे लक्ष लागले आहे.


पुण्यात होत असलेल्या वाहन तोडफोडीच्या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाहीत,हे पहा,असे अजितदादांनी गुरुवारी पोलिस आयुक्तांना बजावले होते.सर्व सोईसुविधा देऊन आणि राजकीय हस्तक्षेप नसताना असे गुन्हे घडत असतील,तर या सुविधा बंद करू,असा इशारा त्यांनी दिला होता.ही तोडफोड करणाऱ्या कोयता गॅंगचा बंदोबस्त करा,त्यांची धिंड काढा, त्यांना मोक्का लावा,असे बजावले होते.त्यानंतर दोन दिवसांतच शहरात अनेक गाड्या एकाचवेळी चिखलीतील साने चौकात काल रात्री फोडण्यात आल्या. त्यामुळे बोलल्यानुसार वागणारे अजितदादा आता काय कारवाई करणार यामुळे शहर पोलिस दल काहीसे चिंतेत पडले आहे.या घटनेला जबाबदार धरून सबंधित स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे काल गाड्यांची तोडफोड करणाऱ्याला मोक्का सोडा,साधी अटकही करणे पोलिसांना शक्य होणार नाही. कारण हा सराईत गुन्हेगार अल्पवयीन आहे.त्याने यापूर्वी एका हॉटेलमालकाकडे मागितलेले पैसे दिले नाहीत,म्हणून त्याच्या गाडीची मोडतोड केली नाही,तर ती जाळूनच टाकली होती.यासह दुसऱ्या एका गुन्ह्यात असे दोनदा त्याला यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. त्याची रवानगी बालसुधारगृहात (रिमांड होम)करण्यात आली होती. तेथून सुटून आल्यानंतर काल त्याने पुन्हा दारुच्या नशेत हातोड्याने वाहने फोडली,असे चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळूंके यांनी आज आपला आवाजला सांगितले.त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान,यानिमित्ताने शहरातील बालगुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.कारण खूनासारख्या गंभीर गुन्ह्यांतही त्यांचा सहभाग आढळलात नाही,तर वाढू लागला आहे.त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. कारण या अल्पवयीन गुन्हेगारांना अटक करता येत नाही. तसेच त्यांना आपला हिसकाही पोलिसांना त्यामुळे दाखवणे शक्य होत नाही.रिमांड होममध्ये रवानगी म्हणजे शिक्षा नसल्याने तेथून सुटका होताच ते पुन्हा गंभीर गुन्हे करतात.त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी,मात्र वाढते.अशा गुन्हेगारांना सुधरवण्यासाठी तसेच त्यांची विघातक मार्गाकडे वाया जाणारी शक्ती विधायक कामाला वळविण्याकरिता माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्यांना खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली होती.त्यातून त्यांनी त्यांची एक फुटबॉलचा संघही तयार केला होता.मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा बालगुन्हेगारीने शहरात उचल खाल्ली असून खूनासारख्या सर्वोच्च गंभीर गुन्हेही ते आता करू लागले आहेत. त्यातूनच त्यांचे वय १४ वर आणण्याचे विधान नुकतेच अजितदादांनी केले.तशी दुरुस्ती कायद्यात झाली,तर,मात्र या बालगुन्हेगारीला काहीसा आळा बसण्याची शक्यता आहे.