उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःहरियाणा,महाराष्ट्रापेक्षा विधानसभेला भाजपने दिल्लीत दणदणीत विजय आज मिळवला.आम आदमी पार्टीचा सुपडा साफ केला. त्यांची दहा वर्षाची सद्दी संपवली.२७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलवले. त्या विजयाचा पिंपरी-चिंचवड भाजपने आपल्या कार्यालयाबाहेर सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करित जल्लोष केला.पेढेही वाटले.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच हा ऐतिहासिक महाविजय मिळाल्याचे यावेळी पक्षाचे शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले.

पक्षाचे शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे,शहर सरचिटणीस शितल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे तसेच प्रमोद ताम्हणकर आदी या आनंदोत्सवात सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी ढोलताशाच्या तालावर नृत्यही केले.महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळल्या.
दिल्लीकरांनी भाजप आणि मोदींवर विश्वास ठेवला
लोकसभेप्रमाणे भाजप व मोदींवर विश्वास ठेवून दिल्लीत विधानसभेला जनतेने एकतर्फी कौल देत केजरीवालांच्या सत्तेला हादरा दिला,अशी प्रतिक्रिया पक्षाचे पिंपरी-चिंचवडकर युवा विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी दिली.प्रदूषणापासून ते पाणीपुरवठ्यापर्यंतचे प्रश्न केजरीवाल सरकारला हाताळता आलेले नाहीत,त्याबरोबर अनेक विकासाची कामेही त्यांनी रखडवली,त्यांनी दिलेली अनेक आश्वासन ही आश्वासनेच राहिली,दुसरीकडे ते भ्रष्टाचारात गुरफटल्याने जनतेने हा कौल दिला,हा विजय जनतेचा आणि मोदींवरील विश्वासाचा आहे,असे ते म्हणाले.