जीबीएस रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन आले अॅक्शन मोडवर, दहा आरओ प्लांट केले बंद

दूषित पाणी वापरून ते शुद्ध म्हणून विकतात पिंपरी-चिंचवडमधील अनेक आरओ प्लांटस

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःगिलियन बेरे सिंड्रोमचे (GBS)रुग्ण दिवसागणिक शहरात वाढू लागल्याने आतापर्यंत प्रतिबंधक उपाययोजना करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका शनिवारी सुट्टीच्या दिवशी अॅक्शन मोडवर आली.दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱे दहा अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्स त्यांनी बंद केले.दरम्यान,पुणे,पिंपरी-चिंचवडमध्येच आढळणारा हा आजार आता मुंबईला पोचला आहे. तेथे एका ज्येष्ठ महिलेला जीबीएस झाल्याचे दिसून आले.

उद्योगनगरीतील जीबीएस रुग्णसंख्या २६ झाली असून त्यातील एकाचा बळी गेला आहे.बारा रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १३ अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील एक व्हेंटीलेटरवर आहे.पुण्यात या रुग्णांचा आकडा ९७ असून त्यातील पाच संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.१७ पेशंट सिरीअस असून ते व्हेंटीलेटरवर आहेत.दरम्यान,दिवसागणिक हे रुग्ण वाढू लागल्याने पिंपरी महापालिका प्रशासन अधिक अलर्ट झाले असून आता त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ प्लांट्सची तपासणी शुक्रवारपासून (ता.७)सुरु केली. त्यात दोषी आढळलेल्या १० प्लांटवर शनिवारी (ता.८)कारवाई केली.संबंधित चालकांना ते तात्काळ बंद करण्यास सांगितले,अशी माहिती माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर यांनी दिली.

दरम्यान,जीबीएसनिमित्त का होईना शहरादील खासगी अनधिकृत आरओ प्लांट्सवर कारवाई सुरु झाली.त्यातील बहूतांश आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करुन पुरवठा करत असल्याचे महापालिकेच्याच तपासणीत आढळले.पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर यांच्यामार्फत क्षेत्रीय कार्यालयनिहाय ही तपासणी सुरु आहे.त्यात फ क्षेत्रीय कार्यालय २, ड क्षेत्रीय कार्यालय २ आरओ प्लांट तर ७ एटीएम आरओ प्लांट, ब क्षेत्रीय कार्यालय १, ग क्षेत्रीय कार्यालय ४ आणि ह क्षेत्रीय कार्यालय १ अशा दहा सदोष आरओ प्लांटवर कारवाई करण्यात आली.नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी पाण्याच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतला जाईल,असे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *