उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःवारंवार आगी लागणाऱ्या आणि इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कुदळवाडी,चिखलीतील भंगार दुकाने,गोदामांवर पिंपरी महापालिकेने शनिवारी (ता.८) मोठा हातोडा चालवला. ४२ एकर जागेतील २२२ अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने जमीनदोस्त केली. १८ लाख ३६ हजार ५३२ चौरस फूट अतिक्रमित क्षेत्र मोकळं केलं.एवढी मोठी कारवाई प्रथमच शहरात झाली.त्यात आठशेपेक्षा जास्त कर्मचारी,अधिकारी सामील झाले होते.
सकाळपासून मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुरु झालेली ही कारवाई सायंकाळीच थांबविण्यात आली.आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने ते हटविण्यात आल्याचे महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी सांगीतले. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या ही अतिक्रमण कारवाई केली.शेखरसिंह,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जातीने त्यावर देखरेख ठेवली.अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचिता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप आदी वरिष्ठ अधिकारी फिल्डवर हजर होते.पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त होता.
महापालिकेच्या अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूरांनी ही कारवाई केली.त्यासाठी १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर करण्यात आला.३ अग्निशमन बंब आणि २ रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारीही या मोहिमेत सामील झाले होते. कुदळवाडीत वारंवार आगीच्या घटना घडल्याने वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले होते.तेथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांमध्ये सुरक्षेचे उपाय केले गेले नव्हते.तेथील भंगार व्यवसासातून नदी प्रदूषित होत होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली,असे शेखरसिंह म्हणाले. तसेच ती यापुढेही सुरु राहील,असे त्यांनी स्पष्ट केले.