उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःउद्योगनगरीची भंगार मालाची बाजारपेठ असलेल्या कुदळवाडी,चिखली येथील अनधिकृत भंगार मालाची दुकाने, गोदामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज पुन्हा मोठा हातोडा मारला.यावेळी शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मागील वेळी स्थानिकांचा झालेला मोठा विरोध आणि त्यांनी केलेला रास्ता रोको यातून धडा घेत पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली.
दोन दिवसांपूर्वी शहर पोलिस आय़ुक्तालय,नवे पुणे ग्रामीण मुख्यालय इमारतीसह विविध विकासकामांचे भुमीपूजन आणि उदघाटन यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात आले होते.त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना सावधगिरीचा उपाय म्हणून असेच स्थानबद्ध करण्यात आले होते.खरं,तर पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ते यावेळी फडणवीसांचे अभिनंदन करणार होते.त्यांच्या दौऱ्याला कसलाच विरोध करणार नव्हते.तरीही त्यांना सकाळी ताब्यात घेण्यात आले. दुपारी फडणवीस शहरातून रवाना झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. त्याची पुनरावृत्ती आज झाली.संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांना सकाळीच वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे छावा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर-पाटील आणि एमआयएमच्या युवा आक्रमक नेत्या रुईनाज शेख यांनाही स्थानबद्ध केले गेले.या दोघांना शहराबाहेर हलवले. अशीच सावधगिरी म्हणून कुदळवाडी,चिखली येथील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. सायंकाळपर्यंत त्यांना सोडण्यात आले नव्हते. येळकर व शेख यांचे फोन बंद येत होते.त्यामुळे ते ताब्यात घेऊन पोलिसांनी बंद केल्याचा संशय आहे.
गेल्यावर्षी ९ डिसेंबरला कुदळवाडीत अनधिकृत भंगार दुकाने व गोदामांना लागलेल्या प्रचंड आगीनंतर स्थानिक आमदार भाजपचे भोसरीचे महेश लांडगे यांनी तेथील अनधिकृत भंगार मालाची दुकाने व गोदामांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभेत केली होती.ही दुकाने व गोदामांत बांगलादेशी आणि रोहिंगे घुसखोर काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.त्यानंतर जाग्या झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तेथे कारवाई सुरु केली.पण,त्याला मोठा विरोध झाला.त्याविरोधात हे व्यावसायिक न्यायालयात गेले.त्यांची ही याचिका परवा फेटाळली गेली.त्यामुळे आजपासून तेथे पुन्हा महापालिकेने हातोडा उगारला. त्यापूर्वी तेथील या पाच हजार दुकाने व गोदामांना त्यांनी नोटिसा बजावल्या.त्याची मुदत संपल्याने महापालिका अॅक्शन मोडवर आली.दरम्यान, ज्यांच्यामुळे ही कारवाई झाली त्या आ. लांडगेंच्या जीवाला यातून धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी अॅड. आतिष लांडगे यांनी केली आहे.