आपला पालकमंत्री नसलेल्या राज्यातील१७ जिल्ह्यात भाजपने का नेमले संपर्कमंत्री ?
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः महायुतीमध्ये यावेळी सरकार स्थापनेपासून पालकमंत्रीपद नियुक्तीपर्यंत मंत्री कोणाला करायचे आणि कोणाला कोणते खाते द्यायचे यावरून मोठा घोळ आणि त्यातून विलंब झाला. दरम्यान, सर्वाधिक जागा मिळाल्याने आपला वरचष्मा वरचेवर दाखविण्याचा प्रयत्न भाजपकडून ,महायुतीत सुरु आहे.त्यातून त्यांनी आपला पालकमंत्री नसलेल्या १७ जिल्ह्यात आपले संपर्कमंत्री नेमल्याने त्याची मोठी चर्चा सुरु आहे.दरम्यान, त्यांच्या या खेळीमुळे पुणे जिल्ह्याला अजितदादा (पवार) पालकमंत्री,तर ते न मिळाल्याने काहीसे नाराज झालेले चंद्रकांतदादा (पाटील)संपर्कमंत्री असे दोन दादा मिळाले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पक्ष वाढीसाठी भाजपने ही चाल खेळली आहे. तसेच पालकमंत्रीपद न मिळालेल्या मंत्र्यांची नाराजीही त्यातून दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.प्रत्यक्षात महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन मित्रपक्ष आणि त्यांच्या पालकमंत्र्यांवर लक्ष ठेवण्याचा खरा हेतू यामागे भाजपचा आहे.नाकापेक्षा मोती जड होऊ न देण्याची खेळी आहे.त्याबद्दल राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाराजी आहे.पण,युती आणि सत्तेत असल्याने ती त्यांना बोलून दाखवता येत नाही. राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून त्याला दुजोरा मिळाला.दरम्यान,पालकमंत्री नेमणुकांतून सुरु झालेला वाद शमला नसून उलट तो वाढला असताना संपर्कमंत्री नेमून भाजपने त्यात आणखी भर टाकली आहे. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीपद नियक्तीनंतर लगेच रद्द झाले असून तेथे अद्याप नवीन नियुक्ती झालेली नसतानाच आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी भाजपने ही नवी चाल केली आहे.त्यातून त्यांनी दोन्ही मित्रपक्षांना चेकमेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.अजितदादांसारख्या इतर काही आक्रमक पालकमंत्र्यांवर अंकुश ठेवण्याचा हेतूही त्यामागे असल्याची चर्चा आहे.