महापालिकेचा कामगार सांगून दुरुस्तीच्या नावाखाली करीत होता चोऱ्या
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात बसविलेल्या सीसीटीव्हीच्या बॅटऱ्या,यूपीएस चोरून त्या भंगारात विकणाऱ्या बुद्धभूषण प्रविण डोंगरे (रा. घरकुल, चिखली) या सराईत चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.दारुच्या नशेसाठी तो या चोऱ्या दिवसाढवळ्या करीत होता. त्यासाठी तो आपण महापालिकेचा कामगार असल्याची बतावणी करीत होता.दरम्यान,या वाढत्या चोऱ्यांमुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभी केलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडत असल्याने पोलिसांनाही तपासात अडथळा येत होता.
स्मार्ट सिटीसह पोलिसांना तपासात मदत व्हावी तसेच वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाईन चलान पाठवता यावे, याकरिता शहरभर काही शेकडो कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही यंत्रणा महापालिकेने बसविली आहे.मात्र,अनेक ठिकाणी तिचे साहित्य चोरीला गेल्यामुळे ती वरचेवर बंद पडत होती.त्यामुळे महापालिकेची नाही,तर पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती.एक नाही,तर अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या विशेषकरून बॅटऱ्या आणि युपीएस चोरीला जात होते.नशेखोऱ आपली नशा भागविण्यासाठी ते चोरी करीत होते,असा पोलिसांचा संशय होता. तो खराही ठरला.अत्यंत महाग असे हे साहित्य हे नशेखोर भंगार म्हणून काडीमोल भावात विकून आपली तलफ भागवित होते.दुसरीकडे या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम असलेल्या विभागाची नाचक्की होणार असल्याने ते सर्वच चोऱ्यांची तक्रार करीत नव्हते.
डोंगरेने अशा तीन चोऱ्यांची कबुली दिली आहे.मात्र, त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांत तो सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. यापूर्वी त्याला भोसरी एमआय़डीसी पोलिसांनी अशाच चोरीत अटक केली होती.त्यातून सुटून येताच त्याने काळेवाडी आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्या पुन्हा केल्या. संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने त्याची धरपकड केली.या पथकातील जावेद मुजावर यांना डोंगरे हा चोरलेले हे साहित्य विकण्यासाठी बीआरटी रोड,चिंचवड येथे येणार असल्याची खबर मिळाली.त्यानुसार तेथे या पथकाचे उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी सहकाऱ्यांसह सापळा लावून डोंगरेला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे चोरीच्या दोन बॅटऱ्या आणि यूपीएस मिळाले. अधिक चौकशीत त्याच्याकडून एकूण सीसीटीव्हीच्या १७ बॅटऱ्या,२१ यूपीएस,गुन्ह्यात वापरत असलेली दुचाकी असा पाच लाख ९८ हजार सातशे रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.त्याला दारूचे व्यसन असल्याचे संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी आपला आवाजला सांगितले.