क्लार्कनंतर इंजिनिअरही सोडू लागले पिंपरी महापालिकेची नोकरी

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः राजीनामा दिलेल्या ११ लिपिकांचे (क्लार्क) राजीनामे एका दिवसात मंजूर करण्याची पाळी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिह यांच्यावर या महिन्याच्या सुरवातीसच आली.त्यानंतर आज,तर इंजिनिअरनेच (अभियंता) श्रीमंत महापालिकेची नोकरी सोडली.त्यामुळे क्लार्कपासून सुरु झालेले हे लोण वरच्या पदापर्यंत पोचले आहे. दुसरीकडे गेल्या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत अनेक महापालिका कर्मचाऱ्यांवर लाचखोरी व इतर फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने आयुक्तांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. सहा महिन्यानंतर ते पुन्हा आता सेवेत आले आहेत.दुसरीकडे सेवेचा राजीनामा देण्याचे सत्र आता महापालिकेत सुरु झाले आहे.

वर्षभरापूर्वीच नोकरीस लागलेले कनिष्ठ अभियंता सचिन गाडेकर यांचा राजीनामा मंजूर केल्याचा आदेश आयुक्तांनी आज काढला.राज्य सरकारच्या नगररचना विभागात रचना सहाय्यक म्हणून निवड झाल्याने गाडेकर यांनी महापालिका नोकरीचा राजीनामा दिला.तर,यापूर्वी त्यांनी तीन तारखेला असे दोन आदेश काढले. त्याव्दारे ११ लिपिकांचे राजीनामे त्यांनी मंजूर केले. त्यांनाही इतरत्र आपल्या आवडीची,मोठ्या पगाराची आणि प्रतिष्ठेची सरकारी नोकरी मिळाल्याने त्यांनी महापालिका सेवेला रामराम केला.त्यांची प्रशासकीय अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,तलाठी,ग्रामसेवक,वरिष्ठ लिपिक, राज्य उत्पादन शुल्क जवान म्हणून निवड झाली आहे.त्यात चार तरुणी आहेत. यातील काहींनी काही महिन्यात,तर अनेकांनी काही दिवसांत महापालिका सेवेला नारळ दिला.

गेल्या वर्षापासून महापालिका सेवेला व त्यातही लिपिक पदाला गळती सुरु झाली.त्यात गेल्यावर्षी २५ सप्टेंबरला एका दिवसाात आठ लिपिकांनी राजीनामा दिला. २०२३ ला महापालिकेने जंबो नोकर भरती केली. ३७१ जागांसाठी जाहिरात दिली.पण, फक्त ३२० जागाच भरल्या गेल्या. एकीकडे बेरोजगारी प्रचंड असताना पात्र ठरलेल्या १०६ उमेदवारांनी पुढील प्रक्रियाच पूर्ण न केल्याने त्यांची निवड महापालिकेने रद्द केली. दुसरीकडे निवड झालेल्या २१६ लिपिकांतील ६१ जणांनी काही महिन्यांतच राजीनामा दिला.त्यामुळे महापालिका नोकरी तरुणांना नको की काय,अशीही चर्चा रंगली.दरम्यान,नोकरी सोडलेल्यांच्या जागेवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *