उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः ड्यूटी बदलल्याच्या क्षुल्लक कारणातून आपल्या सहकारी सिक्यूरिटी गार्डचा चाकूने खून करून फरार झालेला खूनी सुनील अशोकराव कांगणे (वय ३९) य़ाच्या १६ वर्षानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोव्यात जाऊन मुसक्या आवळल्या.त्याने खून केला तेव्हा त्याचे वय २३ होते.सांगवी पोलिसांना तो एवढी वर्षे सापडत नव्हता.गुन्हे शाखा युनीट एकने त्याला पकडले.
१६ वर्षापूर्वी २००९ मध्ये कांगणेने सुभाष सोपान धाकतोंडे (वय ५५,रा.रहाटणी) या आपल्या सहकाऱ्याचा खून केला. नंतर तो फरार झाला. या राज्यातून त्या राज्यात जाऊन तो पोलिसांना चकवा देत होता.अखेरीस तो गोव्यातच जणू काही स्थायिक झाला. तेथे काम करून तो स्वताची गुजराण करीत होता.एवढी वर्षे खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी मिळत नसल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यात लक्ष घातले.त्याला शोधण्याची जबाबदारी गुन्हे शाखा युनीट एकवर टाकली.या पथकाने प्रथम कांगणेचा त्याच्या मूळ गावी नांदेड जिल्ह्यात शोध घेतला.पण,तेथे तो मिळून आला नाही.पुढील चौकशीत तो या राज्यातून दूसऱ्या राज्यात जात असल्याचे आणि अखेरीस त्याने गोव्यात बस्तान बसविल्याचे शोधून काढले.त्यानंतर लगेच एक पथक तिकडे रवाना केले. तेथे एका मंगल कार्यालयात काम करणाऱ्या कांगणेच्या त्यांनी मुसक्या आवळल्या.त्याला पिंपरी चिंचवडला घेऊन आले. हा गुन्हा दाखल असलेल्या सांगवी पोलिसांच्या ताब्यात त्याला त्यांनी दिले.पुढील तपास आता स्थानिक पोलिस करीत आहेत.पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.त्याबद्दल आयुक्तांनी त्यांचे कौतूक केले आहे.