वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्याने पक्षात पुणे जिल्ह्यामध्ये नाराजीचा मोठा सूर
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःलोकसभेतील धवल यशानंतर चार महिन्यांत विधानसभेला तसेच अपय़श मिळाल्याने ठाकरे शिवसेनेने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी संघटनेत खांदेपालट सुरु केला आहे.पुणे जिल्ह्यात तो काही प्रमाणात काल केला गेला. पण, त्यात काही वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याने तो चर्चेचा विषय झाला. लोकसभा लढलेले मावळ लोकसभेचे संपर्कप्रमुख संजोग वाघेरे यांना प्रभारी शहरप्रमुख (पिंपरी,चिंचवड,भोसरी) केल्याने त्यांना पदावनत (डिमोशन) केल्याची चर्चा रंगली.
ठाकरे शिवसेनेचे सहा खासदार शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु असताना पुणे पुणे जिल्ह्यातील काही नाराज पदाधिकारीही ठाकरे शिवसेनेला येत्या काही दिवसांत जय महाराष्ट्र करणार असल्याचे आज समजले. या नाराजांत कालच्या या नियुक्त्यांनी आणखी भर टाकली.ज्या पदाधिकाऱ्याला पक्षातून काढा अशी मागणी करण्यात आली होती,त्यालाच प्रमोशन काल देण्यात आले.त्यामुळे कट्टर,जुना शिवसैनिक संतापला आहे.तर,लोकसभेतील कामगिरी ध्यानात घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी हा खांदेपालट आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, ज्याला पक्षातून काढा त्यालाच पदोन्नती का देण्यात आली याविषयी विचारणा करण्याकरिता शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही.
पिंपरी-चिंचवड शिवसेनचे शहरप्रमुख अॅड सचिन भोसले आहेत. त्यांनी आपण अद्याप पदावर असल्याचे प्रभारी शहरप्रमुखांची नियुक्ती झाल्यानंतर आपला आवाजला सांगितले. त्याचवेळी आपली तीन वर्षाची आपली मुदत संपली आहे,याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नवीन शहरप्रमुखांची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी आपल्याला पुन्हा विचारणा झाली,पण नव्या चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून मी त्याला नकार दिला,असे ते म्हणाले.तर,नवी नियुक्ती हे डिमोशन नसून नवीन शहरप्रमुख नियुक्त होईपर्यंत ही अतिरिक्त जबाबदारी असल्याचे वाघेरे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे सहा महिन्यापूर्वी पक्षात आलेले आक्रमक नेते वसंत मोरे यांना प्रमुख निवडणूक समन्यवक,पुणे शहर हे पद शिवसेनेने काल दिले.म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना लढणार हे जवळपास स्पष्ट झाले. गेल्यावर्षी मार्चमध्ये त्यांनी मनसे सोडली.वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला.तीन महिन्यातच वंचितला रामराम करून ते जुलैमध्ये शिवसेनेत दाखल झाले होते.सहा महिन्यांत उद्धव ठाकरे यांनी ही मोठी जबाबदारी त्यांना दिली.पुणे जिल्ह्यातील कालच्या नेमणुकांत बाळासाहेब फाटक यांना जिल्हा संघटक (चिंचवड,मावळ) केले गेले.परशुराम बडेकर यांना लोणावळा,राजेंद्र मोरे (देहूगाव) आणि संदीप बालघरे (देहूरोड) यांना शहरप्रमुख करण्यात आले आहे.