उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःआपला निकटवर्तीय वाल्मिक कराडला खंडणी आणि खुनाच्या गु्न्ह्यात अटक झाल्याने अगोदरच अडचणीत आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनजंय मुंडे यांच्या अडचणीत आज आणखी भर पडली. त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांना महिन्याला दोन लाख रुपये देखभालीपोटी देण्याचा आदेश मुंबईतील वांद्रे न्यायालयाने दिला.धनजंय मुंडे यांच्याकडून छळ झाल्याचा करुणा यांचा दावाही न्यायालयाने अंशत मान्य केला.या निकालानंतर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव आणखी वाढला.
महिना वीस लाख रुपये देखभालीसाठी मिळावेत,अशी मागणी करुणा यांनी केली होती.गेली तीन वर्षे त्यासाठी त्यांचा लढा सुरु होता.मात्र,ती अंशत मान्य झाली. त्यांना सव्वालाख रुपये,तर अज्ञान मुलगी शिवानी हिच्यासाठी ७५ हजार असे दोन लाख रुपये महिन्याला देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.बी.जाधव यांनी मुंडे यांना दिला.तसेच अर्जदार करुणा यांचा कसलाच छळ करू नये,असेही त्यांना बजावले.मुलगा शिशिव हा सज्ञान असल्याने त्याला देखभाल खर्च दे्ण्यास न्यायालयाने नकार दिला.दरम्यान,आपली मागणी पूर्ण मान्य न झाल्याने या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात अपिल करणार असल्याचे करुणा यांनी सांगितले.तर,आपण ठेवलेली बाई नसून मुंडेंची पहिली पत्नी असल्याचे न्यायालयाने मान्य केल्याचे समाधान आहे,असे त्या म्हणाल्या.करुणा या मुंडेंबरोबर लिव्ह इन रिलेशिनमध्ये होत्या,असे त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.तर, ९ जानेवारी १९९८ ला आपले लग्न झाले.२०१८ पर्यंत त्यांचे व्यवस्थित सुरु होते,असा दावा करुणा यांनी केला.नंतर मुंडेंचं राजश्री यांच्याशी लग्न झाले.
कराडमुळे अगोदरच अडचणीत आलेल्या मुंडेंवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ते मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप नुकताच केला.त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली.तर, आज त्याआणखी वाढल्या.त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आणखी जोर आला.आजच्या निकालानंतर दमानिया यांनी करुणा यांचे अभिनंदन केले.तसेच हा वैयक्तिक विषय असल्याने त्यावर बोलण्याचे टाळले.मात्र,भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निकालानंतर पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.तसेच घरगुती हिंसाचारात दोषी ठऱलेल्या मुंडेंना मंत्रीमंडळात ठेवणार का,असा सवाल केला त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे,असे त्या म्हणाल्या.त्यांनीही करुणा यांचे ही लढाई लढून जिकल्याबद्दल अभिनंदन केले.