पुणे जिल्हा विभाजन नाही,त्यामुळे नवा शिवनेरी जिल्हा नाही

पोलिसांच्या जोडीने अजितदादांनी महेशदादांचेही टोचले कान

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः राज्यात २१ नवे जिल्हे होणार असल्याची सोशल मिडियावर जोरात फिरणारी पोस्ट ही अफवा असल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनीही आज शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर भागासाठी शिवनेरी जिल्हा होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.दरम्यान,पुणे जिल्ह्याचे विभाजन होणारच असेल, तर शिवनेरी जिल्हा करण्याची मागणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आज मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात जाधववाडी,चिखलीच्या कार्यक्रमात केली होती.

राज्यात अनेक जिल्हे करणार असाल,तर आमची इच्छा आहे त्यात शिवनेरी व्हावा,असे हा कार्यक्रम ज्यांच्या मतदारसंघात झाला,ते आ. लांडगे आपल्या भाषणात म्हणाले. गेले महिनाभर सोशल मिडियात धुमाकूळ घातलेल्या महाराष्ट्रात २१ नवे जिल्हे होणार या बातमीतून त्यांनी आपली ही इच्छा बोलून दाखवली. या २१ जिल्ह्यांत पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असे या पोस्टमध्ये म्हटले होते. जर, ते होणार असेल,तर नव्या जिल्ह्याला शिवनेरी नाव द्या,अशी आ.लाडगेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. पण,मुख्यमंत्र्यांअगोदर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी अर्थमंत्री या नात्याने लांडगेची इच्छा पूर्ण होणार नसल्याचे सांगितले.म्हणजेच त्यांनी पुणे जिल्ह्याचे तूर्त,तरी विभाजन होणार नाही,हे स्पष्ट केले.२१ जिल्हे होणार नाही,हे ही सांगितले.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यापूर्वी एकही नवा जिल्हा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.तर,मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे वर्षाला पन्नास हजार कोटीचा बोझा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्याने त्यांच्यावरील कर्जाचा बोझा साडेसात लाख कोटींवर गेला आहे.त्यामुळे शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक लागणारा एक नवा जिल्हा सुद्धा तुर्तास अस्तित्वात येणे अवघड आहे,अशी बातमी आपला आवाजनेही दिली होती.त्यावर आज शिक्कामोर्तब झालं

दरम्यान,पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालय स्थापनेचे तसेच इमारतीसाठी जागा देऊन तेथे ते उभारण्याचे श्रेय आ. लांडगेंनी फक्त फडणवीसांना दिले. त्याचा अजितदादांनी आपल्या भाषणात लगेच खरपूस समाचार घेतला. महेशला माझं नाव घ्यायला काय वाईट वाटलं,माहित नाही,असा टोला त्यांनी लगावला. कुणी पिंपरी-चिंचवड सुधरवलं,असा सवाल केला.१९९२ ते २०१७ पर्यंत २५ वर्षे या शहराच्या विकासासाठी झटलो,हे येथील अधिकारी सांगतील,असे ते म्हणाले.युतीत आहोत,याकडे लक्ष वेधत चांगलं केलं,तर चांगलं म्हणायला शिका,एवढा शहाजोगपणा दाखवू नका,असा सल्ला दिला.त्याचवेळी मी दिलदार असल्याने ज्याने केलं,त्याचे श्रेय मी त्याला देत असतो,असे अजितदादांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आ. लाडगेंनी शहर पोलिस आयुक्तालयाचे क्रेडिट अजितदादांना डावलून फक्त फडणवीसांनाच देण्याच्या कृतीवर लगेच त्यांना घरचा आहेर मिळाला. भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महेशदादांना लक्ष्य केलं.त्यांना अजितदादांनीच भोसरी गावठाणातून नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आणले,स्थायी समिती अध्यक्ष केलं,त्यामुळे नंतर ते आमदार झाले,याकडे काळभोर यांनी लक्ष वेधले. अजितदादांसोबत प्रा.रामकृष्ण मोरे यांचेही शहर उभारणीत मोठे योगदान आहे,असे ते म्हणाले.पण,फडणवीसांच्या फक्त पुढे पुढे करून सहानुभूती मिळवण्याचा आ. लांडगे प्रयत्न करत असून त्यातून ते तोंडघशी पडत आहेत,असा हल्लाबोल काळभोरांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *