उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे भुमीपूजन आणि उदघाटन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले.नव्या पुणे ग्रामीण पोलिस कार्यालयाचेही भुमीपूजन यावेळी कुदळ मारून करण्यात आले. यावेळी या दोघांनीही पोलिसांचे कान टोचले. उद्योग तथा उद्योजकांना होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही,असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.त्यांच्याकडून वसूली करणारा माझा,अजितदादांचा वा एकनाथ शिंदे असा युतीतीलच नाही,तर कुठल्याही राजकीय पक्षाचा असो त्याला मोक्का लावा,असा आदेश त्यांनी दिला.तर,पुण्यासारख्या वाहन तोडफोडीच्या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये झाल्या,तर पोलिसांना दिलेल्या सुविधा बंद करू,असे उपमुख्यमंत्री क़डाडले. गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढून त्यांना मोक्का लावा,असे ते म्हणाले.

एकूण पावणेपाचशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे भुमीपूजन आणि उदघाटन झाले.त्यात १८० कोटी रुपये खर्चून नऊ एकर जागेत पोलिस आयुक्तालय बांधले जाणार असून त्याचे भुमीपूजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी कुदळ मारून केले.कालपासून तब्येत नरमगरम असल्याने आणि चाकण येथे एका शस्त्रात्र निर्मिती उद्योगाच्या उदघाटनाला जायचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी १४ मिनिटांचे आटोपशीर पण नेहमीसारखेच दमदार भाषण केले. त्यात त्यांनी याचवर्षी पोलिस आयुक्तालय स्वताच्या जागेत जाईल,असा विश्वास व्य़क्त केला.त्याच्या उदघाटनाला आम्हीच येऊ,तसेच आज न आलेले दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यावेळी असतील,असे ते म्हणाले. पुणे जिल्ह्यातून उद्योजकांच्या तक्रारी आल्या असल्याचे सांगत त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत,असा सज्जड दम त्यांनी पोलिसांना यावेळी भरला.त्यांना असा त्रास देणारे, त्यांच्याकडून वसूली करणाऱ्यांना मोक्काचा हिसका दाखवा,असा आदेश त्यांनी दिला.कारण पुणे जिल्हा हा निर्मितीची राजधानीच नाही,तर आयटी हबही आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेथेच नाही,तर राज्यातही मोठी गुंतवणूक येणार असल्याने तेथे सुरक्षिततेच्या वातावरणाची मोठी आवश्यकता आहे,असे ते म्हणाले.महापालिकेचे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, एआयचा वापर असलेले होर्डिग धोरणाचे कौतूक करीत ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्याच्या विकासाला पुढे नेणारा पुरंदरचा विमानतळ करणारच, असे सांगत त्यासाठी जमिन अधिग्रहणाला चांगला दर देण्यास येत्या कॅबिनेटमध्ये मान्यता देऊ,असा शब्द त्यांनी दिला.तसेच तो फक्त विमानतळच नसेल,तर लॉजिस्टीक पार्क असेल,असे ते म्हणाले,
अजितदादांनी आपल्या आवडीच्या शहरात तब्बल २५ मिनिटे भाषण केले.त्यात त्यांचा अधिक रोख हा शहर पोलिस दलावर राहिला.गेल्या दोन दिवसांत पुण्यात झालेल्या वाहन तोडफोडीच्या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाहीत,हे पहा,असे त्यांनी पोलिस आयुक्तांना बजावले. सर्व सोईसुविधा देऊन आणि राजकीय हस्तक्षेप नसताना असे गुन्हे घडत असतील,तर या सुविधा बंद करू,असा इशाराच त्यांनी दिला.कोयता गॅंगचा बंदोबस्त करा, त्यांची धिंड काढा, त्यांना मोक्का लावा,असे त्यांनी फर्मावले.नियम,घटना व संविधान याच्या बाहेर कुणी जाता नये,असे त्यांनी बजावले.पुरंदर विमानतळ रखडल्याने पुणे जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लागल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.शिवसेना नेते संजय राऊत यांचे नाव न घेता कुठला,तरी भोंगा सकाळीच वाजतो,अशी त्यांच्यावर बोचरी टीका केली.माध्यमेही त्यांच्या तावडीतून यावेळी सुटली नाहीत.शिंदे वर्षा खाली करत नाहीत,त्यांनी तेथे गोहाटीतून आणलेली शिंगे पुरली आहे,राज्यात नवे २१ जिल्हे होणार अशा काहीही बातम्या टीआरपीसाठी ते देतात,असे ते म्हणाले.प्रत्यक्षात फडणवीसांची कन्या यावर्षी दहावीत असल्याने ते वर्षावर रहायला गेले नाहीत,असा खुलासा त्यांनी केला.
राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,विधान परिषद सदस्य अमित गोरखे, चिंचवड,भोसरी,पिंपरीचे आमदार अनुक्रमे शंकर जगताप,महेश लांडगे,अण्णा बनसोडे, पुरंदरचे विजय शिवतारे, खेड-आळंदीचे बाबाजी काळे,जुन्नरचे शरद सोनवणे यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.