उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःस्थापनेपासून गेली साडेसहा वर्षे भाड्याच्या जागेत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला स्वताच्या जागेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन भाड्याच्या जागेत राहिलेल्या आयुक्तालयाला अखेर स्वमालकीची इमारत मिळणार असून तिचे भुमीपूजन उद्या (ता.६)दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी येथे भुमीपूजन आणि विकासकामांच्या उदघाटन दौऱ्यावर आज असलेले फडणवीस हे उद्या उद्योगनगरीत त्यासाठी येत आहेत. पोलिस आयुक्तालयासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही विविध विकासकामांची उदघाटने आणि भुमीपूजने ते जाधववाडी,चिखली येथून ऑनलाईन करणार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची हा पहिलीच शहर भेट आहे.विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ते उद्योगनगरीत आले होते.स्थापनेनंतर पोलिस आयुक्तालयाला अनेक मुलभूत समस्या भेडसावत होत्या.त्यातील काही विनयकुमार चौबे हे पोलिस आयुक्त म्हणून येताच त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत सोडवून घेतल्या,मार्गी लावल्या.मग ते अपुरे मनुष्यबळ असो की साधने.स्थापनेपासून आयुक्तालय हे भाड्याच्या जागेत आहे.प्रथम ते चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होते. तर,आता ते चिंचवडलाच महापालिका शाळेच्या इमारतीत आहे.आयुक्तालयासाठी जागा मिळाली.पण,काम सुरु झाले नव्हते.आता उद्या भुमीपूजन होऊन ते सुरु होणार असल्याने स्वमालकीच्या जागेत आता ते जाणार आहे. महाळुंगे येथील औद्योगिक पोलिस संकूल आणि देहूरोड येथील पोलिस विश्रामगृहाचेही भूमीपूजनही उद्या होणार आहे.यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर उपस्थित असणार आहेत.
महापालिकेचे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र,अग्निशमन प्रबोधिनी इमारत, आकुर्डी अग्निशमन केंद्र, पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणारा पूल,मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड (२४ मीटर डी.पी रस्ता) व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड (१८ मीटर डी.पी रस्ता) तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण या कामांस सुरवात उद्या मुख्यमंत्री करणार आहेत.तर, स्मार्ट सिटीची संगणक प्रणाली,चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची नवीन इमारत, टाकाऊपासून टिकाऊ (वेस्ट टू वंडर) वस्तूंपासून निर्मिती केलेल्या कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर बसविण्यात आलेले रुफ टॉप सोलर सिस्टीम (सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प) आदी सेवाप्रकल्प लोकार्पित ते करतील.लोट्टे या बहूराष्ट्रीय कंपनीच्या तळेगाव एमआयडीसीतील सर्वात मोठ्या उत्पादन प्रकल्पाचे तसेच मोशी येथील डॉ. पटवर्धन यांच्या अद्ययावत धनश्री हॉस्पिटल या १०१ बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचेही उदघाटनही ते करणार आहेत.
दरम्यान,महाविकास आघाडीच्या सत्ता काळात पिंपरी-चिंचवडमधील विकासकामे आणि प्रलंबित प्रकल्पांना खोडा घालण्याचे काम झाले होते,असा आरोप भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज केला.मात्र, महायुती सत्तेत येताच शहर विकासाला गती मिळाली. त्यातून पोलीस आयुक्तालयाचे भूमिपूजन होत आहे.पिंपरी-चिंचवडकरांसाठी निश्चितच ही समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी या या भूमीपूजन आणि उदघाटनावर दिली.पोलीस आयुक्तालयासाठी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवडकरांना शब्द दिला होता.त्याच्या दुसऱ्या वर्षी ते सुरु झाले. नंतर त्याच्या जागेसाठी पाठपुरावा केला.त्याला युती सरकारने मंजुरी दिली. तर, आता तेथे आय़ुक्तालयाची पायाभरणी होत आहे,याचे समाधान आहे, असे,ते म्हणाले.