उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः संत तुकाराम महाराज यांचे वंशज, प्रसिद्ध किर्तनकार आणि व्याख्याते शिरीष महाराज मोरे (वय ३२,रा.देहू,ता.हवेली,जि.पुणे) यांनी राहत्या घरी आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे श्रीक्षेत्र देहूच नाही,तर हवेली आणि लगतच्या मावळ तालुक्यावर शोककळा पसरली.आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत तसे म्हटले आहे.ते अविवाहित होते.पण, आईवडिलांच्या आग्रहाखातर ते लग्नाला तयार झाले.त्यातून नुकताच त्यांचा साखरपुडा झाला होता.लग्न बाकी होते.
आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाल्याने मोरे महाराजांच्या मृ्त्यूबाबत गुन्हा नाही,तर आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केल्याचे देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे य़ांनी आपला आवाजला सांगितले.दरम्यान,मोरे महाराजांचा मृतदेह सकाळी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला, तेव्हा मोठी गर्दी झाली होती. सांयकाळी चार वाजता देहू येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.ते आईवडिलांसह राहत होते. काल रात्री पहिल्या मजल्यावर झोपायला ते गेले. सकाळी ते खाली आलेच नाही.म्हणून त्यांचे आईवडिल त्यांना पहायला गेले असता त्यांना त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद दिसला. म्हणून खिडकीतून त्यांनी पाहिले असता शिरीषमहाराजांनी किर्तनकार तथा आपल्या वारकरी वेषभुषेचा एक भाग असलेल्या उपरण्याचाच गळफास करीत तो पंख्याला लावून आत्महत्या केल्याचे दिसले.त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला.पण,तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. महाराजांचा मृत्यू झाला होता.
शिरीषमहाराज प्रखर हिंदुत्ववादी आणि संभाजी भिडेगुरुजींच्या विचारांचे पाईक होते.ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन हिंदूंना त्यांनी केले होते. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. धर्मांतरावरील त्यांच्या वक्तव्याची चर्चा झाली होती.