उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः येरव़डा,पुणे येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयातच एका वकिलाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना जीएसटी निरीक्षक तुषारकुमार दत्तात्रेय माळी (वय ३३) याला मंगळवारी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)पकडले.त्यामुळे जीएसटी कार्यालयात मोठी खळबळ उडाली.
एका वकिलाकडून चक्क कार्यालयातच माळीने लाच घेण्याचे धाडस केले,हे विशेष.त्याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.चार दिवसांत या पोलिस ठाण्यात दाखल झालेला लाचखोरीचा हा दुसरा गुन्हा आहे.कारण याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे एसीबीने ३१ जानेवारीला ट्रॅप केला. हवेली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या सेतू कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर वंदना दिनेश शिंदे (वय ५०) आणि जयश्री रोहिदास पवार (वय ४५) या महिलांना पकडले.त्यांनी चक्क एका भूमीहिनाकडूनच पाचशे रुपयांची लाच मागून चारशे रुपये कार्यालयात स्वीकारले.भूमिहीन असल्याबाबतचा दाखला देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली होती.आजच्या घटनेत तक्रारदार वकिलांचे अशिल व्यापारी यांचा जीएसटी नंबर जीएसटी विभागाने रद्द केला होता.जीएसटीची कामे करणारे हे वकिल रद्द झालेल्या आपल्या अशिलाचा जीएसटी नंबर पुन्हा चालू करण्यासाठी जीएसटी कार्यालयात गेले.त्यावेळी माळी याने हे काम करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागितली आणि ती कार्यालयातच घेण्याचे धाडसही केले.