उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घूण हत्येसह दोन कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनजंय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाल्याने मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने मोठा जोर धरला असताना दुसरीकडे त्यांची भगवानगडाचे (ता.पाथर्डी,जि.अहिल्यानगर)महंत नामदेवशास्त्री सानप यांनी ३० जानेवारी रोजी पाठराखण केली. त्यांच्या मुंडेंना सेफ करण्याच्या या प्रयत्नाला जोरदार विरोध झाला.राज्यभर मोठा गदारोळ उठला. त्याचे पडसाद उमटणे अद्याप सुरुच असून त्यातून आता नामदेवशास्त्रींचे भंडारा डोंगरावर (ता.मावळ,जि.पुणे) ७ तारखेला होणारे किर्तन आज रद्द झाले.
स्व.देशमुख प्रकरणात मुंडे गुन्हेगार नाहीत,हे शंभर टक्के सांगतो,असे नामदेवशास्त्री म्हणाले.त्यामुळे त्यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पहिल्यांदा भडकले.
नंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई बरसल्या. आपली पहिली पत्नी करुणा मुंडे हिला खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्याचे कौतूक कसे बरे करता,असा सवाल त्यांनी केला. यावरून नामदेवशास्त्रींवर सर्वदूर टीका झाली. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत.त्याची प्रचिती आज झाली. भंडारा डोंगरावर माघ दशमी सप्ताह सोहळ्यात ७ तारखेला होणारे नामदेवशास्त्रींचे किर्तन त्यांना होत असलेल्या मोठ्या विरोधामुळे ऐनवेळी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्स्टने रद्द केले.त्याऐवजी हभप सुदाम महाराज पानेगावकर यांचे किर्तन त्यादिवशी ठेवले.
नामदेवशास्त्रींनी स्व.देशमुख प्रकरणात मुंडेंची पाठराखण केल्याने पुणे जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला.त्यांनी नामदेवशास्त्रींचे किर्तने ठेवलेल्या भंडारा डोंगर विश्वस्तांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत नामदेवशास्त्रींचे कीर्तन रद्द करण्याची मागणी केली.अन्यथा, त्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,असा इशारा दिला. त्याची दखल लगेच ट्रस्टने घेतली.त्यांनी मराठा समाजाची विनंती आणि स्थानिक तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी नामदेवशास्त्रींच्या किर्तनावर दिलेल्य़ा समजपत्राचा विचार करून वरील निर्णय घेतला.तत्पूर्वी नामदेवशास्त्रींचे सहकारी विष्णूपंत खेडकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली.