११ मारेकऱ्यांत चार अल्पवयीन,बालगुन्हेगारीचा प्रश्न पुन्है ऐरणीवर
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःभावाला मारहाण करणाऱ्या तरुणाचा एकाने आपल्या दहाजणांच्या कोयता गॅंगच्या मदतीने भरदिवसा निर्घूण खून करून बदला घेतला.तळेगाव दाभाडे येथे ही घटना काल (ता.३१) सरस्वती शाळेजवळ घडली.त्यातून पुणे,पिंपरी चिंचवडनंतर मावळातही कोयता गॅंगने मोठा उच्छाद मांडल्याचे दिसून आले.११ मारेकऱ्यांत चार अल्पवयीन मुले असल्याने गंभीर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग पुन्हा दिसला.याव्दारे बालगुन्हेगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
दरम्यान,या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड शहर पोलिस कामाला लागले. सहा हल्लेखोरांच्या मुसक्या त्यांनी घटनेनंतर बारा तासात त्यांनी आवळल्या. गुन्हे शाखा युनीट पाचने ही कामगिरी केली.सीसीटीव्हीची त्यांना त्याकामी मोठी मदत झाली.पकडलेल्या आरोपीत चार अल्पवयीन आहेत.यातून खूनासारखा गुन्हा करण्यातही मुले कचरत नसल्याची गंभीर बाब समोर आली.सध्या १८ वर्षाखालील गुन्हा करणाऱ्याला बालगुन्हेगार संबोधले जाते.मात्र,असे अल्पवयीन गुन्हेगारच सध्या वाढतच चालले नसून ते खून,खूनी हल्ले यासारखे गंभीर गुन्हेही करू लागले आहेत. त्यामुळेच की काय बालगुन्हेगारांचे वय १४ वर आणण्याचे म्हणजे ते कमी करण्याचे सुतोवाच नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले आहे.या खूनातील फरार पाच आरोपींची नावे समजली असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.तसेच पकडलेल्या इतर दोन सज्ञान आरोपींची वयेही तशी कमीच आहेत.शिवराज भागप्पा कोळी,वय २०रा.वराळे, ता.मावळ,जि.पुणे)आणि सुरज लक्ष्मण निर्मळ (वय २२,रा.चिंचवडेनगर,वाल्हेकरवाडी,पिंपरी-चिंचवड) अशी त्यांची नावे आहेत.त्यांना प्रथम पोलिसांनी पकडले.त्यांच्या चौकशीतून बालगुन्हेगार व इतर आरोपींची नावे समजली.त्यातील बालगुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.
आर्यन बेडेकर (वय 19, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे) असे या घटनेतील मृताचे नाव आहे. त्याने आपल्या पाच साथीदांरांसह आरोपी शिवराजचा भाऊ संतोषला मारहाण केली होती.त्याचा राग मनात धरून शिवराजने आपल्या दहा साथीदारांसह काल आर्यनवर कोयते आणि दांडक्याने हल्ला करून त्याचा खून केला. पकडलेल्या आरोपींनी त्याची कबुलीही दिली.त्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.आता ते फरार आरोपींचा शोध घेत आहेत.गुन्हे शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.