उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेशसारख्या राज्यातीलही भाविकांची गंगेसारखे श्रद्धास्थान असलेली आणि पिंपरी-चिंचवडमधून इंद्रायणाी नदी पुन्हा फेसाळल्याचे शनिवारी (ता.१) दिसले. त्यामुळे पर्यावरण तथा नदीप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला.तसेच नदीप्रदूषण,नदी स्वच्छता,नदी सुधार आणि नदी पुर्नवसनाचा मुद्दाही यामुळे पुन्हा ऐरणीवर आला. गेल्या वर्षापासून दर महिन्याला इंद्रायणीचे पात्र फेसाळून ते जणू काही बर्फाच्छादित होत आहे.
महिन्याभरापूर्वीच २९ डिसेंबरला इंद्रायणी अशीच फेसाळली.ते दृश्य बघण्यासाठी मोठी गर्दीही झाली होती.त्याअगोदर २५ सप्टेंबर, ३० जून,२९मे अशी ती वरचेवर प्रदूषित झाल्याचे पहायला मिळाले होते. सांडपाणी आणि उद्योगनगरीतील रासयनिक उद्याोगांमुळे ती प्रचंड प्रदूषित होत आहे. पण,त्याला जबाबदार असलेल्या उद्योगांवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडक कारवाई करीत नाही.फक्त नोटीसा बजावण्याचे कागदी घोडे नाचवले जातात. वाढत्या नदी प्रदूषणाकडे सर्वांचीच डोळेझाक होत असल्याने नदीप्रेमी संतप्त आहेत. पिंपरी-चिंचवड एमआय़डीसीचा एसटीपी नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याची नुसती चर्चाच आहे.पण,तो होत नसल्याने नदी,मात्र प्रदूषित होणे सुरुच आहे. कारण अनेक उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी तसेच नदीत सोडले जाते.त्याजोडीने लोणावळा येथील उगमापासून तुळापूर येथील संगमापर्यंत नदीच्या आजूबाजूच्या गावांचे,शहराचे सांडपाणीही प्रक्रिया न करता तसेच नदीत सोडले जात असल्याने ती अधिकच प्रदूषित होत चालली आहे.कुठलाही लोकप्रतिनिधी त्याविरुद्ध आवाज उठविताना दिसत नाही.त्यांच्या तसेच प्रशासन आणि राज्य सरकारच्याही फक्त नदी सुधार, नदी प्रदूषणमुक्ती आणि नदी पुर्नजीवनाच्या नुसत्या गप्पा गेल्या काही वर्षांपासून चालल्या आहेत. होत, तर काहीच नाही.पिंपरी-चिंचवड एमआयडीसीमुळे व त्यातही तेथील रासयनिक कारखान्यांमुळे इंद्रायणीच नाही,तर शहरातून वाहणारी पवना ही दुसरी नदीही प्रचंड प्रदूषित होऊन तिची गटारगंगा झाली आहे. त्यात दोन्ही नद्यांच्या पात्रात अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरु असून त्याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या दोन्ही व त्यातही पवनेचे पात्र आकुंचन होत चालले आहे.ही नदी काही ठिकाणी ओढाच झाली आहे.
पिंपरी-चिंचवडनंतर पुढे आळंदीतून इंद्रायणी वाहत जाऊन तुळापूरला तिचा संगम होतो.वारीला येणारे वारकरी व एरव्हीही राज्यभरातून तसेच राज्याबाहेरूनही माऊलींच्या दर्शनाला येणारे भाविक हे आळंदीत इंद्रायणीच्या पात्रात डुबकी मारतात.तिचे पाणी तिर्थ म्हणून प्राशन करतात. पण, आता पाण्याऐवजी चक्क फेसच फेस नदीपात्रात मोशी ते आळंदीदरम्यान झाल्याचे शनिवारी सकाळी पहायला मिळाले. जणू काही हिमालयात आल्याचा भास झाला. नदीचे संपूर्ण पात्र बर्फाच्छादित झाल्यासारखे वा़टले. मात्र,त्याबद्दल आमच्याकडे कुणीही कसलीही तक्रार दिली नसल्याचे सांगत या नदीप्रदूषणाबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख आणि सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी आपला आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले.ते या मोठ्या गंभीर प्रश्नाबद्दल अनभिज्ञ दिसले.दरम्यान,त्यांच्या या वक्तव्याबद्दल पर्यावरणप्रेमी माधव पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला.नदीप्रदूषणावर त्यांनी कडक प्रतिक्रिया दिली.एकीकडे इंद्रायणीचे असं थडगं होत चाललं असताना दुसरीकडे इंद्रायणी थडी भरविली जात असल्याने त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. सध्या महाकुंभमध्ये गंगा नदीत प्रय़ागराज (पूर्वीचे अलाहाबाद,उत्तरप्रदेश) येथे शाही,पवित्र स्थान केले जात असताना इकडे इंद्रायणीत,मात्र केमिकल स्नात होत आहे,असे ते म्हणाले.त्यांना सकाळी इंद्रायणीचे हे प्रदूषण दिसताच ते उद्विग्न झाले.वारकऱ्यांच्या भावनेशीच नाही,तर जीवाशीही हा खेळ असल्याचे ते म्हणाले.