सभासदांकडून मेंटेनन्स घेऊन त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या नाठाळ चेअरमन आणि सेक्रेटरी विरुद्धही सभासदांना तक्रार करता येते…
सोसायटी मेंटेनन्सच्या नावाखाली सभासदांकडून करण्यात येते अव्वा की,सव्वा वसुली
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःएखादी हौसिंग गृहनिर्माण संस्था (सोसायटी) वा व्यापारी संकुलाच्या (कमर्शिअल कॉम्प्लेक्स) सभासदाने देखभाल व दुरुस्ती खर्च (मेटेंनन्स) दिला नाही,तर त्याच्याविरुद्ध सोसायटीची व्यवस्थापन समिती (मॅनेजिंग कमिटी) जिल्हा उपनिबंधकाकडे (डीडीआर) तक्रार करते.तशीच,जर व्यवस्थापन समिती सभासदांना पाणी,स्वच्छता अशा मुलभूत सेवा मेटेंनन्स घेऊनही देण्यास असमर्थ ठरली असेल,तर तिच्याविरुद्धही डीडीआरकडे दाद मागता येते.त्याला पिंपरी-चिंचवडचे काम पाहणारे डीडीआर (पुणे शहर सहा) मुकुंद पवार यांनी आपला आवाजशी बोलताना आज दुजोरा दिला.
अनेक सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिट्या सभासदांकडून महिन्याला मेटेंनन्स घेतात.पण,त्या ज्यासाठी तो घेतला जातो,त्या सुविधा (उदा.पाणी,स्वच्छता आदी)पुरेशा प्रमाणात देऊ शकत नाहीत वा देतच नाहीत.त्यामुळे पाण्याचे टॅंकर मागवावे लागतात.सभासदांना आपल्या सदनिका (फ्लॅट)तथा गाळ्याबाहेरचा परिसर वैयक्तिक खर्चातून स्वच्च करण्याची पाळी येते. लिफ्ट बंद असल्याने सदस्याच्या कुटुंबातील ज्येष्ठांची मोठी गैरसोय होते.परिसर नियमित स्वच्छ न केल्याने सोसायटीत दुर्गंधी येते.काही सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिट्या,तर सभासदांना हिशोबच देत नाहीत. नियमित बैठका घेत नाहीत.त्यासाठी सर्व सदस्यांना निमंत्रित केले जात नाही.ठरल्यानुसार सोसायटीची निवडणूक घेत नाहीत.या सर्व बाबी अयोग्य असून त्या नियमभंग करणाऱ्या असल्याने त्याविरोधात आमच्याकडे तक्रार करता येते,असे डीडीआर पवार म्हणाले.
जसे सभासदांनी मेटेंनन्स भरणे,देणे जरुरीचे आहे,तसेच सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिटीनेही पाणी,स्वच्छता यासारख्या मुलभूत सुविधा सदस्य़ांना देणे,पुरविणे क्रमप्राप्त आहे, असे चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी स्पष्ट केले.त्या न देणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीविरुद्ध डीडीआरकडे दाद मागता येते,असे त्यांनी सांगितले.अशीच प्रतिक्रिया अॅड.अतिश लांडगे यांनी दिली. गृहनिर्माण संस्था तथा व्यापारी संकुलाच्या व्यवस्थापन समितीकडे खर्चाचा हिशोब आणि बैठकांचे मिनीटस सभासदांना मागता येतात,ऑडिट करुन घेणे त्यांना बंधनकारक आहे. तसेच मुलभूत सुविधा देणेही त्यांचे कर्तव्य आहे.त्यात,जर ते कमी पडत असतील,तर त्याविरुद्ध डीडीआरकडे तक्रार करता येते,असे अॅड. लांडगे म्हणाले.

