पिंपरी-चिंचवडमध्येही भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षाचा बीडसारखाच आका ?

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत मोठा आका,छोटा आका (मास्टरमाईंड) असल्याचा आरोपच झाला नाही,तर एका खून आणि खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड हा छोटा आका मोक्का त पकडलाही गेला.बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी आका या शब्दाची मराठी साहित्यात भर यानिमित्ताने घातली. त्यानंतर हा शब्द राज्यभर वापरला जातो आहे.उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारात बीडसारखा आका असल्याचा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आज केला.त्यासंदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे निवेदन दिले.

स्थानिक भाजप आमदार हा आका असून तो म्हणेल,ती पूर्वदिशा असा कारभार प्रशासकीय राजवटीत पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या सुरु असल्याचा खळबळजनक दावा भापकरांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.त्याची प्रत त्यांनी बीडच्या आकाविरुद्ध आवाज उठविलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठवली आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या आकांविरुद्धही त्या आवाज उठविणार का,याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.जास्त दराने निविदा काढण्याचे काम पिंपरी महापालिकेत सुरु असून त्या रद्द करण्याची मागणी सत्तेतील इतर आमदार, खासदार आपल्याकडे करत असताना आपण स्थानिक सत्ताधारी आका आमदाराला हाताशी धरून गैरव्यवहार करत आहात,असा हल्लाबोल भापकरांनी आयुक्तांवर त्यांनाच दिलेल्या निवेदनात केला.महापालिकेचे इतर अधिकारीही या आकाचे लांगूलचाचन करत असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.टेंडरमधील गैरव्यवहाराची त्यांनी तीन उदाहरणेही दिली.

महापालिका शाळांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या टेंडरमध्ये २५ कोटींचा भ्रष्टाचार झा्ल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे. यापूर्वीची दोन वर्षासाठी ३४ कोटी रुपयांची ही निविदा यावेळी तीन वर्षाकरिता ५१ कोटी अपेक्षित असताना ती ६१ कोटी रुपये कशी झाली,हा सवाल त्यांनी केला. ती ब्रिक्स या ईडीची चौकशी सुरु असलेल्या कंपनीला देण्यावरही त्यांनी संशय व्यक्त केला.तसेच कमी दराने निविदा भरलेल्या कंपन्यांना या निविदा प्रक्रियेत अपात्र करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दुसऱ्या वैद्यकीय विभागाची निविदा ही अनुभव नसलेल्या मंत्र्यांशी सबंधित कंपनीला देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा त्यांनी केला.तर,तिसऱ्या रखवालदार पुरविण्याचे टेंडर एका विशिष्ट ठेकेदारालाच मिळेल,यासाठी त्याच्या अटी व शर्तीत बदल केल्याचाही भापकरांचा आरोप आहे.या कंत्राटदाराची कागदपत्रे चुकीची असताना त्यांना पात्र ठरवले गेल्याचा त्यांचा दावा आहे.हा गैरव्यवहार व भ्रष्टाचार असून आपण आयुक्त तथा प्रशासक म्हणून तो थांबवून त्याची चौकशी करणे व दोषींवरवर कारवाई करणे ही आपली जबाबदारी आहे,असे विनंती त्यांनी केली आहे.