“फसक्लास दाभाडे” सिनेमातील दिग्दर्शक कलाकारांचे नारायणगावात स्वागत

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

आपल्याच मातीमध्ये तयार केलेल्या आपल्या चित्रपटाला आपल्याच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे या भागात फसक्लास दाभाडे चित्रपटाचे चित्रीकरण केल्याचे सौभाग्य मिळाल्याचा आनंद आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहील अशा भावना दिग्दर्शक व कलाकार हेमंत ढोमे यांनी नारायणगाव येथे व्यक्त केल्या.
सध्या सर्वत्र गाजत असलेल्या “फसक्लास दाभाडे” या मराठी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह त्यांची पत्नी व निर्माती क्षीती जोग, कलाकार सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, व अमेय वाघ यांचा सन्मान नारायणगाव येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या ठिकाणी करण्यात आला त्यावेळी हेमंत ढोमे बोलत होते.
याप्रसंगी उपसरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे आदी मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचं विशेष सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी स्मिता संतोष विटे, हेमंत कांबळे, निलेश दळवी, मंदार रत्नपारखी,श्रीयश मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटरमध्ये “फसक्लास दाभाडे” सिनेमाच्या प्रमोशन प्रसंगी या सर्व कलाकारांसमवेत छोटा कलाकार मल्हार निलेश खोकराळे याचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर, सविता खैरे, विक्रांत खैरे, सोनल खैरे, स्मिता विटे, वैजयंती कोऱ्हाळे, माजी उपसरपंच ज्योती संते, सुरेखा बेनके, ज्योती बढे, सुनिता भोर, अर्चना पडवळ अमृता गडगे,सांची विटे, रिल्स स्टार शुभांगी रणदिवे, बाळासाहेब मुळे, इनरव्हील क्लबच्या सदस्या व अनेक महिला प्रेक्षक उपस्थित होत्या.
यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी नारायणगाव व जुन्नर तालुक्यासह शेजारील तालुक्यात झालेल्या फसक्लास दाभाडे या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी बोलताना सांगितले की, आपल्या याच ग्रामीण भागातील मी देखील असल्यामुळे आपल्या भागातील विविध परिसर व वेगवेगळी ठिकाणे या चित्रपटात समाविष्ट केल्यामुळे मला मनस्वी आनंद होत आहे. येथील सर्वांनीच मला खूप सहकार्य केले व नारायणगाव, मंचर, माळीण, नाणेघाट, दावडी निमगाव, निघोज, पिंपरखेड, मांजरवाडी या उत्तर पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील गावांमध्ये शूटिंग करताना अनेक आठवणी आयुष्यभर आपल्या स्मरणात राहतील अशा भावना व्यक्त केल्या निर्माती क्षीती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनीही फसक्लास दाभाडे या चित्रपटाला सर्वत्र मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *