उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःगंभीर नसल्याचे प्रशासन सांगत असलेल्या जीबीएस (Guillain – Barre Syndrome)या दुर्मिळ आजाराने पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला बळी घेतला. तो ३६ वर्षाचा पिंपळे गुरव येथील उबेरचालक आहे.पुण्यात एकजण या रोगाला बळी पडल्यानंतर त्याचे लोण आता उद्योगनगरीत आल्याने शहरवासियांत थोडे का होईना चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे त्यामुळे महापालिका आणखी सावध झाली आहे.
महापालिकेने,मात्र हा जीबीएसचा संशयित मृत्यू असल्याचा दावा केला.महापालिकेच्याच पिंपरी येथील कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) हा बळी गेला. या आजाराचा अधिक प्रार्दूभाव हा महिलांपेक्षा पुरषांनाच अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. पहिला बळी हा सुद्धा पुरुषाचाच गेला.त्याला २१ तारखेला वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते.तेथील तज्ञ समितीने सदर मृत्यूचा तपास केला असता तो न्युमोनियामुळे श्वसन संस्थेवर झालेला आघात व त्यामुळे
श्वास घेण्यास त्रास होऊन झाल्याचे समजले.या रुग्णास जीबीएस झाला होता.म्हणून त्याची मज्जातंतुच्या कार्यक्षमतेची चाचणी २२ तारखेला करण्यात आली होती.त्याला इतर आजारही होते, असे वायसीएममधून सांगण्यात आले.यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
दरम्यान.जीबीएसची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी व नागरिकांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी महापालिकेने आता हेल्पलाईन सुरु केली असून ती २४ तास सुरु राहणार आहे.तिचा क्रमांक ७७५८९३३०१७ हा असून त्यावर रहिवाशांनी
शंका समाधानासाठी संपर्क साधावा, तेथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत,असे आवाहन पालिकेच्या आऱोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे.या रोगाचे १३ रुग्ण शहरात असून त्यातील वरील पहिला बळी गेला.पाच जणांना उपचार करून घरी जाऊ देण्यात आले असून सातजण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत.सावधगिरीचा उपाय म्हणून रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण सुरु केले असून त्यात आतापर्यंत १० हजार ४३ घरे तपासण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.तर,परवा त्यांनी शहरातील डॉक्टरांचे या आजारावर एक वेबिनार घेऊन त्यांचे मार्गदर्शनही केले आहे.