रवींद्र खुडे विभागीय संपादक
शिरूर : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे, जिल्हा परिषद पुणे येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचायत समिती शिरूर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी, दिनांक २१/०१/२०२५ रोजी तालुकास्तरावर सेफ्टी ॲण्ड सिक्युरिटी या विषयावर विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मुख्याध्यापकांना संबोधित करताना शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले की, “शाळेमध्ये विद्यार्थी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाही याची मुख्याध्यापकांनी नेहमी दक्षता घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा शाळा स्तरावर उभी करावी. विद्यार्थी हे आई – वडील व शिक्षक यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे शिक्षकांनी आपले आचरण नेहमी शुद्ध व वर्तन चांगले ठेवावे. शैक्षणिक गुणवत्तेबद्दल बोलताना ते म्हणाले की, काही ठराविक शाळा शिष्यवृत्ती व विद्यार्थी गुणवत्तेसाठी चांगले काम करत आहेत. पट जास्त असूनही गुणवत्ता वाढीसाठी तेथील शिक्षक चांगले काम करत आहेत. याउलट काही शाळेत अतिशय निराशाजनक चित्र आहे.अशा शाळांकडे यापुढे लक्ष दिले जाईल. बीटस्तरावर मुख्याध्यापकांची दरमहा सभा आयोजित करून गुणवत्तेचा व शाळा स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमांचा विस्तार अधिकारी यांनी आढावा घ्यावा. प्रत्येक शाळेने गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवावा. शिक्षकांनी समाजाशी संपर्क ठेवून शाळेसाठी लोकसहभाग मिळवावा. शिक्षकांनी आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करून गुणवत्तेचे सार्वत्रिकरण करावे. शिक्षकी पेशामुळे आज शिक्षकांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी जपली पाहिजे. शिक्षकाजवळ गुणवत्ता असली पाहिजे. आपले ज्ञान सतत अद्यावत ठेवले पाहिजे. शाळा हे मंदिर व विद्यार्थी हे दैवत मानून मनापासून शिक्षकाने काम करावे. नियमित व्यायाम करावा. वय वर्ष पन्नास नंतर नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करावी,” अशा मौलिक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
सेफ्टी व सिक्युरिटी कार्यक्रमाचे पुणे जिल्हा समन्वयक अक्षय वाडनकार व तालुका समन्वयक दिनेश पालवे, यांनी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला असून, विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. हिंसाचार, शाळा सुरक्षा, आपत्ती प्रतिबंधात्मक उपाय, बाल संरक्षण, आरोग्य व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सर्व शाळांना सुरक्षापोस्टर किटचे वाटप करण्यात आले.
शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी एन कळमकर यांनी, १०० दिवस कृती कार्यक्रम व आदर्श शाळा निर्मिती या विषयावर, तर विस्तार अधिकारी के बी खोडदे यांनी प्रशासकीय बाबींविषयी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्ताराधिकारी रघुनाथ पवार, काळुराम चकोर व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे यांनी आभार मानले.