‘आचल’ च्या मृत्यूनंतरही तिचे डोळे पाहणार सभोवतालचे जग

आचलच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबियांचा अवयव दानाचा स्तुत्य निर्णय

किरण वाजगे, कार्यकारी संपादक

नारायणगाव: हिवरे तर्फे नारायणगाव येथील रहिवासी असलेली आचल रवींद्र शिंदे या विद्यार्थिनीचा शनिवारी (दि.२५) रोजी मोटर सायकलवर जात असताना अपघातात मृत्यू झाला. अचलच्या मृत्यूनंतर काळजावर दगड ठेवून वडील रवींद्र रामभाऊ शिंदे, आई वर्षा आणि मामा विजय डुकरे यांनी मयत ‘आचल’ चे डोळे, फुफुस, हृदय, लिव्हर, किडनी हे अवयव दान करून इतर रुग्णांना जीवनदान दिले आहे. आचल च्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी अवयव दान केल्याने त्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळेच तिचा जरी मृत्यू झाला असला तरी तिचे डोळे सभोवतालचे जग पाहणार असल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आचल शनिवारी दुपारी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर स्वतःचा वाढदिवस असल्याने केक व पावभाजी आणण्यासाठी स्कुटी वरून नारायणगाव येथे गेली. साहित्य घरी घेऊन येत असताना नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरील नारायणवाडी येथील पुलाखाली स्कुटी व समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात डांबरी रस्त्यावर पडल्याने आचलच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. अचल च्या मृत्यूनंतर मणिपाल हॉस्पिटल बाणेर (पुणे) येथे अवयव दानाचा निर्णय घेण्यात आला. शरीराची राख रांगोळी होण्यापेक्षा गरजू रुग्णांना अवयव दान करून रुग्ण आचलच्या रूपाने जग पाहतील असा धाडसी आणि समाजाला दिशा देणारा निर्णय घेण्यात आला.
मयत ‘आचल’ च्या घरात आई -वडील व मोठी बहीण पायल असा परिवार होता. वडार समाजाचे असलेले आई -वडील मोलमजुरी करून कुटुंब चालवत होते तर दोन्ही मुली आई-वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मोलमजुरी करून शिक्षण घेत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *