नारायणगावातील भीषण अपघात प्रकरण
नारायणगाव दि. १८ (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव,दि.१८ येथे शुक्रवारी (दि.१७) झालेल्या एसटी बस, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सिमो व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आयशर ट्रक चालक रोहितकुमार जगमाल सिंग याला आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिनांक १७ रोजी सायंकाळी चाकण येथून सीताफिने अटक केल्यानंतर आज त्याला जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आले.
त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी तर एसटी बस चालक भाऊसाहेब भास्कर गायकवाड यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
अपघातातानंतर जखमी झालेल्या सात रुग्णांना नारायणगाव येथील मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका रुग्णाला नातेवाईकांच्या सांगण्यावरून उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरित सहा रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित चार रुग्णांवर उपचार चालू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे मॅक्स केअर रुग्णालयातील डॉ. प्रतीक पाटील यांनी सांगितले.

