मृतांच्या कुटुंबांना मदत देऊन अपघातांचा प्रश्न सुटणार नाही

वाढते अपघात रोखण्यासाठी अवैध वाहतुकीला आळा घाला

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी नारायणगाव येथे तीन वाहनांच्या भीषण अपघातात नऊजणांचा मृत्यू झाला,तर पाच पाच गंभीर जखमी झाले.त्याची माहिती मिळताच स्थानिक आमदार शरद सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची सरकारी मदत मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.त्यानंतर आता स्थानिक खासदार शरद पवार राष्ट्रवादीचे डॉ.अमोल कोल्हे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घटना अतिशय दुर्दैवी व दुखद असल्याचे सांगत त्यातील मृतांना सोशल मिडियाव्दारे श्रद्धांजली वाहिली. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली.

भरधाव वेगातील हरियाणा पासिंगच्या आयशर ट्रकने आज सकाळी नऊ वाजता प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमा जीपला मागून जोरदार धडक दिली.त्यामुळे ही जीप समोर उभ्या असलेल्या एसटीवर जाऊन आदळली.अशाप्रकारे या तीन वाहनांच्या अपघातात जीपमधील नऊजण जागीच मरण पावले,तर पाच प्रवासी जखमी झाले.घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ.पंकज देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली.ही घटना अतिशय दुर्दैवी आणि दुखद असल्याचे सांगत त्यातील मृतांना अजित पवार यांनी एक्सवर श्रद्धांजली वाहिली.मृतांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केली.तसेच जखमी लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली.अशीच भावना शिवसेना उपनेते तथा पुणे म्हाडा सभापती आढळरावांनी फेसबुकवर व्यक्त केली.

भीषण अपघाताची ही घटना मन सुन्न करणारी आहे,असे खा. कोल्हेंनी एक्सवरील शोकसंदेशात म्हटले.या भागातील अपघातांची ही मालिका दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली.नागरिकांच्या जिविताचा हा प्रश्न केवळ मृतांच्या नातेवाईकांना रोख रक्कम देऊन सुटणार नाही, तर,अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले.तसेच रखडलेली रस्त्यांची कामे मार्गी लावणे, तसेच अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जलद धोरण राबवविण्याची विनंती त्यांनी राज्य सरकारला केली.या अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांनी जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे.दरम्यान,मुंबईत असल्याने घटनास्थळी लगेच भेट देऊ शकले नाहीत,असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.