तुतारी सोडून पुन्हा घड्याळावर पिंपरी महापालिकेची निवडणूक लढविणार
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःविधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीसह महायुतीला राज्यात प्रचंड बहूमत मिळाले.त्यामुळे आघाडीत गेलेल्यांना पुन्हा महायुतीत परतण्याचे वेध आता लागले आहेत. भोसरीतून तुतारीवर विधानसभा लढलेले पूर्वीच्या एकसंध राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे हे सुद्धा आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या वीस माजी नगरसेवकांसह पुन्हा अजित पवार राष्ट्रवादीत परतण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे नातेवाईक आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी त्याचे स्पष्ट संकेत आज आपला आवाजशी बोलताना दिले.
लोकसभेला महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळाल्याने गव्हाणेच नाही,तर महायुतीतील अनेकजण हे आघाडीत गेले होते. शिरुर लोकसभेत तीनवेळा शिवसेनेचे खासदार राहिलेले शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सुद्धा अजित पवार राष्ट्रवादीकडून म्हणजे घड्याळावर २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली.त्यात त्यांना अपयश आले. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नव्हता.म्हणून आता त्यांनी पुन्हा शिवसेनेचेच काम सुरु केले.तसेच काहीसे गव्हाणे यांच्याबाबतीत घडले.त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी घड्याळ सोडून तुतारी हाती घेतली. अजित पवार राष्ट्रवादीतून शरद पवार गटात प्रवेश केला.भोसरीतून ते तुतारीवर लढले,पण हरले.दरम्यान,विधानसभेला राष्ट्रवादीसह युतीला दणदणीत यश मिळाले.त्यामुळे युती सोडलेल्या गव्हाणेसारख्यांना पुन्हा परतण्याचे वेध लागले आहेत. आमदारकी नाही,तर किमान आता महापालिका निवडणूक लढवून पुन्हा स्थायी समिती अध्यक्षपद तसचे महापौर होण्याच्या मनिषेतून ते घरवापसी करणार असल्याचे समजते.त्याला लांडे यांनी दुजोरा दिला.दरम्यान,विधानसभेला पराजित होताच अजितदादांनी गव्हाणेंना लगेच फोन केला होता.त्याला त्यांनीआपला आवाजशी बोलताना स्वत आज दुजोरा दिला.
लोकसभेला घड्याळ आणि विधानसभेला तुतारीचे काम केलेले मा.आ.लांडे यांनी आपण पक्ष सोडलाच नव्हता, दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नव्हता,त्यामुळे गव्हाणेंसह घरवापसी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असे सांगत आपण अजित पवार राष्ट्रवादीतच असल्याचे स्पष्ट केले.अजितदादा आमचे पहिल्यापासून नेते असून त्यांनी शहराचा विकास केला,आम्हाला ताकद दिली,असे ते म्हणाले.आपण पवार परिवाराचा घटक असून त्या परिवाराबरोबरच असल्याचे त्यांनी सांगत त्यांनी नक्की कोणत्या पवारांसोबत हा संभ्रम,मात्र कायम ठेवलाच नाही,तर तो आणखी वाढवला.दुसरा पक्ष नसल्याने गव्हाणे हे माझ्याशी चर्चा करून इकडेच (अजित पवार राष्ट्रवादी) येतील.कारण अजितदादांनीच त्यांना स्थायी समिती अध्यक्ष,शहराध्यक्ष केलेले आहे,असे ते म्हणाले.तसेच विधानसभेला त्यांच्यासाठी काम केलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नका,त्यांना ताकद द्या,असे आपण गव्हाणेंना सांगितले असून त्यासाठी त्यांची घरवापसी आवश्यक आहे,याकडे लांडे यांनी लक्ष वेधले.

