खंडणीत अडथळा ठरल्याने सरपंच देशमुखांची झाली हत्या

वाल्मिक कराडची परदेशातही मालमत्ता असल्याचा संशय

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण बुधवारी (ता.१५) अखेर समजले.मस्साजोग येथील अवादा पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी मागण्यात ते अडथळा ठरत असल्याने त्यांचे अपहरण करून हत्या केली गेल्याचा दावा एसआयटीने बीड येथील विशेष न्यायालयात आज केला.या मोक्काच्या गुन्ह्यात हे कटकारस्थान करणारा मुख्य आरोपी आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनजंय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने आज दिली.

वाल्मिकची पुण्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे काल आढळले.तर,आज पिंपरी-चिंचवडमध्येही कोटीचा त्याचा फ्लॅट वाकड या आलिशान भागात असल्याचे समजले. बीडच नाही,तर राज्यात इतरत्र त्याने अशाप्रकारे कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी व बेकायदेशीर मालमत्ता जमविल्याचा पोलिसांना संशय आहे.परदेशातही ती असून तिचा शोध घ्यायचा आहे,असे एक कारण एसआयटीने आज बीड येथील विशेष न्यायालया वाल्मिकच्या पोलिस कोठडीसाठी दिले.खंडणी मिळण्यात अडथळा ठरल्याने देशमुखांचा त्याने कट करून खून केला असा दावा त्यांनी न्याय़ालयात केला.फरार आरोपी कृष्णा आंधळेचा व त्याच्या पदेशातील प्रॉपर्टीचा शोध घेण्यासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्य़क असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.देशमुख हत्येतील गुन्ह्यात पकडलेल्या चाटे व घुले यांच्याशी खून होण्यापूर्वी वाल्मिकचे काय बोलणे झाले त्याचा शोध घेण्यासाठीही त्यांनी त्याची दहा दिवसांची पोलिस कोठडी मागितली.पण,न्यायालय़ाने ती सात दिवस म्हणजे २२ तारखेपर्यंत दिली.

दरम्यान,मोक्कात पोलिस कोठडी झाल्याने वाल्मिकचा पाय आज आणखी खोलात गेला.त्यामुळे धनजंय मुंडे यांच्या सुद्धा अडचणी वाढल्य़ा.त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा येऊ शकतो.तसेच वाल्मिकमागे ई़डीचीही चौकशी लागू शकते.दुसरीकडे त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही कारवाई सुरु केली आहे. दीड लाखाचा कर थकविल्याने त्याचा फ्लॅट पालिका आता सील करणार आहे.तो वाल्मिक आणि त्याची पत्नी मंजलीच्या नावे आहे.करवसुलीसाठी त्याचा लिलाव केला जाऊ शकतो,असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (करसंकलन व करनिर्धारण विभाग) अविनाश शिंदे यांनी आपला आवाजला सांगितले. २०२१ मध्ये नोंदणी झाल्यापासून त्याचा करच भरण्यात आलेला नाही,हे विशेष.दुसरीकडे अशा थकबाकीदारांच्या मिळकती महापालिकेने जप्त केल्या आहेत.पण, लाखात कर थकित असून सुद्धा वाल्मिकवर ही कारवाई चार वर्षात झाली नव्हती,हे विशेष. २०२२ पर्यंत भाजप पिंपरी महापालिकेत सत्तेत होती.पण,त्यानंतर सुरु झालेल्या प्रशासकीय कारभारात,तरी ती व्हायला पाहिजे होती,अशी तक्रारवजा भावना प्रामाणिक प्रामाणिक करदात्यांत आहे.देशमुख हत्येनंतर ही कारवाई आता सुरु होणार असल्याने हे उशिराचे शहाणपण ठरणार आहे.