भाऊंना शहराध्यक्ष केले,अन दादांना पक्षात घेतले
उत्तम कुटे,संपादक
पिंपरी :शंकर जगताप (चिंचवड) आणि महेश लांडगे (भोसरी) या भाजपच्या उद्योगनगरीतील दोन नवनिर्वाचित आमदारांचा काल माजी केंद्रीय मंत्री,माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी त्यांनी गतवेळी २०१७ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत पक्षाने प्रथमच सत्ता कशी आणली,याचा गौप्यस्फोट केला.यावेळी,तर तशी परिस्थिती नसल्याने मनपात पुन्हा कमळ फुलणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही,असा दावा त्यांनी केला.

गेल्यावेळी पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी चिंचवडचे त्यावेळचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची मोठी मिनतवारी करीत त्यांना शहराध्यक्ष केले.पण,महेशदादा पक्षात येत नाहीत,तोपर्यंत ही निवडणूक जिंकता येत नाही हे ध्यानात आल्याने पैलवान दादांना डाव टाकला,त्यांना पक्षात आणले.नंतर आझमभाईंना घेऊन पहिल्यांदा बहूमत मिळवले,असे पिंपरी मनपात पहिल्यांदा सत्ता कशी मिळवली,त्याचे गुपित दानवेंनी उघड केले.यावेळी,तर पिंपरी पालिका जिंकायला या दोघांचीच (आ.जगताप,लांडगे) ताकद एवढी आहे की वरच्यांची (वरिष्ठ) गरजच लागणार नाही,असे ते म्हणाले.आ.जगताप,लांडगे टीमने एकत्रित काम केले,तर मनपा ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढवावी,अशी भूमिका पक्ष पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. त्यावर एकदिलाने काम करा, आपला विजय निश्चित असून काळया दगडावरील ती पांढरी रेघ आहे, असे दानवे म्हणाले.
जगताप,लांडगेंसह पिंपरीचे युतीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचेही सकारात्मक बदल घडवल्याबद्दल दानवेंनी यावेळी अभिनंदन केले.तर,गैरसमज पसरविणाऱ्या विरोधकांना टीकेचे लक्ष्य केलं.त्यांना कन्विंन्स करणे जमले नाही,फक्त कनफ्यूज करण्याचे काम त्यांनी केले,अशी टीका त्यांनी केली.आ.लांडगे व जगतापांचा त्यांनी शाल, श्रीफळ, पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.यावेळी विधान परिषद सदस्य अमित गोरखे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे,प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर माई ढोरे, शहर कार्याध्यक्ष बापू काटे, सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, शैला मोळक, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, अॅड.मोरेश्वर शेडगे,युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर आदी व्यासपीठावर होते.

