अटकपूर्व जामीन फेटाळल्याने लाचखोर न्यायाधीश निकमांना अटकेची शक्यता

लाचखोरीतील आरोपी न्या.निकमांचा साथीदार निघाला मुंबईचा सहाय्यक फौजदार

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःसातारा सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनजंय निकम यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी एका तरुणीकडे केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच (ता.११) घडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनंतर आरोपी न्या. निकमांनी सातारा सत्र न्यायालयात या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून धाव घेतली होती.पण,त्यांचा अर्ज काल फेटाळण्यात आल्याने त्यांना आता अटक होण्याची शक्यता आहे.

अपहार व फसवणुकीच्या गुन्ह्यात सातारा शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला जामीन देण्यासाठी त्याच्या मुलीकडे न्या. निकमांनी किशोर संभाजी खरात,आनंद मोहन खरात व आणखी एक अनोळखी अशा तिघांमार्फत लाच मागितली होती. .पण,एसीबीच्या ट्रॅपचा सुगावा लागल्याने लाचेचे पैसे न घेता हे त्रिकूट पळून गेले.त्यामुळे हा ट्रॅप फसला.पण, पडताळणीत न्या.निकमांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले असल्याने त्यांना एसीबीने आरोपी केले.त्यांचा या गुन्ह्यातील सहकारी किशोर खरात हा मुंबई पोलिस दलात (सशस्त्र विभाग,वरळी)सहाय्यक पोलिस फौजदार (जमादार) असल्याचे नंतरच्या तपासात आढळले. दरम्यान, न्या. निकमांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज काल फेटाळण्यात आला.त्यामुळे त्यांना अटक होऊ शकते, असे ही कारवाई करणारे सातारा एसीबीचे डीवायएसपी (पोलिस उपअधिक्षक) आणि या गुन्ह्याचे तपासाधिकारी अनिल कटके यांनी आपला आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले.या गुन्ह्यात अद्याप एकाही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.