मुख्यमंत्री फडणवीस बांधताहेत आपली टीम

पुन्हा युतीची सत्ता येऊनही होताहेत बदल्या

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःराज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता आली.तरीही, प्रशासनात बदल होत असून वरिष्ठ आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ लागल्या आहेत. त्यात काल रात्री उशीरा आणखी तीन वरिष्ठ आय़पीएस अधिकार्यांची भर पडली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी आपली टीम तयार करण्यास सुरवात केली आहे.त्यातून युतीची सत्ता कायम राहूनही प्रशासनात बदल सुरु झाला आहे.येत्या काही दिवसांत व त्यातही विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस,आयपीएस) बदल्या अपेक्षित आहेत.

फडणवीसांनी प्रशासनातील साफसफाईला आपल्या कार्यालयापासून सुरवात केली. ५ डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून शपथ त्यांनी घेतली.नंतर लगेच त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील सीएमओतील (मुख्यमंत्री कार्यालय) अधिकाऱ्यांवर पहिली कुऱ्हाड चालवली.तेथील वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांची उचलबांगडी केली.त्यांच्या जागी त्यांनी रामेश्वर नाईक हा आपला माणूस बसवला.त्यानंतर त्यांनी त्यांचेच म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे सचिव आणि अत्य़ंत प्रामाणिक तसेच कार्यक्षम आयएएस अधिकारी डॉ.श्रीकर परदेशी यांना पुन्हा आपल्याकडेच (मुख्यमंत्र्यांचे सचिव) ठेवले.तर,काल त्यांनी दुसऱ्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मेट्रोवुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांना आपल्या कार्यालयाचे प्रधान सचिव केले.अशा प्रकारे त्यांनी आपली टीम बांधण्यास सुरवात केली आहे.त्यात येत्या काही दिवसांत राज्यातील प्रशासनात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.त्यात पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि फडणवीसांच्या मर्जीतील श्रावण हर्डीकर यांचीही बदली होऊ शकते.त्यांना नागपूरहून त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून आणले होते.

प्रशासनात बदल करताना शिंदेच्या काळातील अधिकारी हटवायला फडणवीसांनी सुरवात केली आहे.तूर्तास त्यांनी आपले म्हणजे सीएमओ तील अधिकारी बदलले आहेत. हळूहळू हे सत्र नागपूर,मुंबई,ठाणे,पुणे असे राज्यभर जाणार आहे.कारण येत्या चार महिन्यात तेथील महापालिकांसह राज्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.त्यावरही कब्जा करण्यासाठी युतीच्या मर्जीतील अधिकारी त्या त्या ठिकाणी नेमले जाणार आहेत. त्याला वेग हिवाळी अधिवेशन संपताच येणार आहे.दरम्यान,मोजक्या,पण महत्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांचा खांदेपालट केल्यानंतर तसाच तो काल रात्री उशीरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा करण्यात आला.त्यात पुण्यातील दोन पोलिस उपायुक्तांना (डीसीपी) फिल्ड पोस्टिंगवरून साईड पोस्टिंगला टाकण्यात आले. म्हणजे एकप्रकारे त्यांना शिक्षाच देण्यात आली.त्यातील आर.राजा यांची पोलिस दळणवळण,माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे,तर तेजस्वी सातपुते यांची शस्त्र निरीक्षण शाखेत पोलिस अधिक्षक (एसपी) म्हणून बदली करण्यात आली. तर, दुसऱ्या बदली आदेशाव्दारे गृह विभागाने राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे विभाग) सुखविंदरसिंह यांनी अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना) म्हणून बदली केली.एकूणच राज्यात नवी विटी,नवे राज्य सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *