उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःमुख्यमंत्री कोणाला करायचे याचा तिढा सुटून अखेर बारा दिवसांनंतर राज्यात सरकार स्थापन झाले.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाच तारखेला झाला.पण,आता कोणाला कोणते मंत्रालय द्यायचे यावरून पूर्ण मंत्रीमंडळ आठ दिवस उलटूनही अद्याप स्थापन झालेले नाही.दुसरीकडे,मात्र सात आमदार निवडून आलेल्या लिंगायत समाजाने एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांची मागणी गुरुवारी (ता.१२) पिंपरी-चिंचवडमध्ये केल्याने ती चर्चेचा विषय झाली.
निगडी येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याला हार घालून ही मागणी करण्यात आली.त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिंगायत समाज विकास प्रबोधन समितीने निवेदन व्हाटसअपवर पाठविले.राज्यात सव्वा कोटी म्हणजे नऊ टक्के लिंगायत समाज असून चाळीस विधानसभा मतदारसंघात तो विखुरलेला आहे.त्यापैकी २५ ठिकाणी भाजपचे आमदार या समाजामुळे निवडून आल्याचा दावा वरील समितीचे अध्यक्ष सोमनाथ तथा सोमेश वैद्य यांनी केला.समाजाचे सात आमदार निवडून आले असून त्यातील मित्र पक्षाचे विनय कोरे (कोल्हापूर), भाजपचे विजय देशमुख (उत्तर सोलापूर), सचिन कल्याण शेट्टी (अक्कलकोट) यांच्यापैकी एकाला कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी समाजाची असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
लिंगायत समाज हा व्यापारी असल्याने राजकारणापासून काहीसा दूर आहे.परिणामी समाजाचे कमी आमदार निवडून येत असल्याची खंत मुख्यमत्र्यांना दिलेल्या मागणी पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.आपण बहूजनाचे नेते असल्याने आम्हाला तुम्ही मंत्रीपद द्याल,समाजाच्या विकासाला ताकद मिळावी म्हणून ते हवे असल्याने कोणत्याही लिंगायत आमदाराला ते द्या, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, आआपले मंत्रीमंडळ तयार करताना फडणवीस हे विभागीय तसेच जातीयही समतोल साधण्याची दाट शक्यता आहे.