सर्वाधिक महापुरुष आणि व्यक्तींना वंदन करणारे सोनवणे एकमेव
प्रतिनिधी
मुंबईःविधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज सत्ताधारी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.ती घेताना भाजप आमदारांनी भगवे,तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या जॅकेटच्या रंगाचे गुलाबी फेटे घातले होते.चार आमदार वगळता इतरांनी मराठीतून शपथ घेतली.त्यानंतर भाजप आमदारांनी जय श्रीराम म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईश्वरसाक्ष,तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकारमंत्री आंबेगाव-शिरुरचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली.इतर आमदारांनी महापुरुषांना वंदन करीत ती घेतली. त्यात जुन्नरचे अपक्ष शरददादा सोनवणे यांनी शपथेच्या सुरवातीला सर्वाधिक महापुरुष व व्यक्तींची नावे घेतली.तसेच तिचा समारोप करतानाही सर्वाधिक जयघोष केला.अखंड हिंदुस्थानचे ध्वजधारी विश्वसम्राट छत्रपती शिवराय,हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी,राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि आनंद दिघे यांना वंदन करीत त्यांनी शपथ सुरू केली.तिची सांगता त्यांनी जयहिंद,जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम,जय बिरसा मुंडा,जय आदिवासी आणि जय अखंड हिदुस्थान अशी केली.त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या बिरसा मुंडा या आदीवासी बांधवांचा त्यांनी खास जयघोष केला.
परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला.त्यानंतर आमदारांच्या शपथविधीसाठी आजपासून तीन दिवसांचे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले.त्यात आज व उद्या हे शपथविधी होणार आहेत. मात्र,त्यात आज सत्ताधारी युती आमदारांचाच तो झाला. कारण विरोधी बाकावरील आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून त्यावर बहिष्कार टाकला.त्यामुळे उद्या ते शपथ घेतील.अन्यथा त्यांना अध्यक्ष निवडीच्या परवाच्या सभागृह कामकाजात सहभागी होता येणार नाही.
युती सरकारचे ट्रबलशूटर आणि फडणवीसांचे जवळचे असे जामनेरचे गिरीश महाजन, त्यांच्याच पक्षाच्या नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे,पनवेलचे प्रशांत ठाकूर आणि सांगलीचे सुधीर गाडगीळ या भाजप आमदारांनी संस्कृतमधून शपथ घेतली.इतरांनी ती मराठीत घेतली.यावेळी शपथ घ्यायला सभागृहात आलेले पुण्यातील कसबापेठचे भाजप आमदार हेमंत रासने हे काहीसे गोंधळले.पहिल्यांदाच आमदार झाल्याने तसेच सभागृहाची माहिती नसल्यामुळे ते विरोधी बाकांच्या दिशेने निघाले.ते तेथे बसणार तेवढ्यात हा प्रकार अजितदादांच्या लक्षात आला.त्यांनी रासनेंना सत्ताधारी बाकावर आणून बसवले.