ईव्हीएमवरून आघाडीच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार

तर,आघाड़ी रडीचा डाव खेळत असल्याचा युतीचा पलटवार

प्रतिनिधी
मुंबईःईव्हीएमच्या मुद्यावरून आमदारांच्या शपथविधीवर आघाडीने आज बहिष्कार टाकला.त्यामुळे फक्त युती आमदारांचा तो झाला.युतीचे राहिलेले व आघाडीचे आमदार आता उद्या ही शपथ घेण्याची शक्यता आहे.दरम्यान, युतीला मोठे बहूमत मिळाल्याने ईव्हीएमचा विषय काढून आघाडी रडीचा डाव खेळत असल्याचा पलटवार युतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच केला.

मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा निर्णय मविआने घेतला असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.राज्यात युतीचे सरकार आले असले, तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही, अशीच भावना जनतेची आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही,असा दावा त्यांनी केला. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे, तीच राज्यातील बहुतांश जनतेची आहे.असे विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले.राज्यात शेतकरी आत्महत्या सुरु असताना मतांची चोरी करून आलेल्या या सरकारने आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली.कारण,त्यांना या आत्महत्यांचं काही देणंघेणं नाही,असा हल्लाबोल त्यांनी केला.

आघाडीचा रडीचा डाव

युतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा प्रतिहल्ला युतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला. लोकसभेला ईव्हीएमने ३१ जागा आघाडीला दिल्या, त्यावेळी ईव्हीएम मशीन चांगली होती. मात्र विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला, तर ईव्हीएमला दोष द्यायला मविआने सुरुवात केली,याकडे त्यांनी लक्ष वेधले.संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळ करतोय हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *