उत्तर पुणे जिल्ह्यात पर्यटनाला वाव मिळणार,विकासही होणार
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःउत्तर पुणे जिल्ह्यातील धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाबरोबर विकासाला सुद्धा चालना देणारा मोठा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल घेतला.त्यांनी भीमाशंकर-राजगुरुनगर आणि जुन्नर-तळेघर या दोन रस्त्यांची पुर्नबांधणी,रुंदीकरण आणि अपग्रेडिंगसाठी साडेतेवीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीसह भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक ओझरची कनेक्टिव्हिटी सुधारणार असल्याचे खुद्द गडकरींनी म्हटले आहे.
दरम्यान,याबाबातचे ट्विट रोडकरी समजल्या जाणाऱ्या गडकरींनी काल करताच लगेच त्यावरून उत्तर पुणे जिल्ह्यात श्रेयाची लढाई सुरु झाली.आपल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याचा दावा करणारे फ्लेक्स झळकले.राष्ट्रीय महामार्ग साठवरील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर-तळेघर-वाडा-राजगुरूनगर आणि जुन्नर-घोडेगाव-तळेघर या दोन रस्त्यांचे पेव्ह्ड शोल्डरसहित इंटरमिडिएट लेनपासून २-लेन रुंदीकरण, पुनर्बांधणी व अपग्रेडिंग होणार आहे.त्याची मागणी गेल्या काही वर्षापासून होती. होती.मोदी ३ सरकारमध्ये आता ती मंजूर झाली.त्यामुळे चास कमान धरण आणि डिंभे धरणाचीही कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
राजगुरुनगर (खेड) -वाडा-भीमाशंकर रस्ता अत्यंत अरुंद,कच्चा,धोकादायक असल्याने शॉर्टकट असूनही भाविक मंचर-
घोडेगाव असा लांबचा वळसा घालून श्री क्षेत्र भीमाशंकरला सध्या जात आहेत.त्यांचा हा वळसा आता थांबणार असून त्यांच्या वेळ,इंधन,पैशाची बचत होईल. त्यातून प्रदूषणाला आळाही बसणार आहे.पावसाळ्यात भीमाशंकरला जसे भाविक येतात,तसे निसर्ग पर्यटनासाठी पर्यटकही येतात.त्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या रस्त्यांची पावसाळ्यात दुर्दशा झालेली असते.खेड-आळंदीतून ठाकरे शिवसेनेचे बाबाजी काळे,तर जुन्नरला शिंदे शिवसेनेचे बंडखोर अपक्ष शरद सोनवणे आमदार म्हणून नुकतेच निवडून आले.त्यांचा शपथविधी होण्यापूर्वीच त्यांच्या मतदारसंघाचे रुपडे पालटवणारा,त्याला पर्यटननगरी करण्यास हातभार लावणारा हा निर्णय झाल्याचे हा त्यांचा पायगुण असल्याची चर्चाही ऐकायला मिळाली.दरम्यान,यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आदिवासींचा विकास होणार असून तेथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे आ. काळे यांनी आपला आवाजला सांगितले.
गडकरींच्या जवळचे समजले जाणारे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांचा भीमाशंकर-खेड रस्त्यासाठी गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा सुरु होता. ते वाडा भागातील मूळचे रहिवासी असल्याने पावसाळ्यात होणाऱ्या या रस्त्याच्या दुरावस्था लक्षात घेऊन त्याच्या अपग्रेडेशनसाठी ते प्रयत्नशील होते. यामुळे खेडच नाही,तर जुन्नर तालुक्याच्याही पश्चिम भागातील आदिवासी पट्याचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे या पट्याला पर्यटनाच्या दृष्टीने आता अधिक महत्व येईल,असे ते म्हणाले.या दोन रस्त्यांमुळे खेड,आंबेगाव आणि जुन्रर तालुक्यांना त्यातही तेथील पश्चिम भागाला मोठा फायदा होणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष (मावळ) आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे- पाटील यांनी सांगितले.उर्वरित महाराष्ट्राशी सहज आणि वेगाने हा भाग आता जोडला जाईल,या भागातील पर्यटनाला चालना मिळेल,रोजगार निर्माण होतील, जमिनींचे भाव वाढतील,असे ते म्हणाले.

