उपमुख्यमंत्री फडणवीसांचे सचिव डॉ.परदेशी आता मुख्यमंत्री फडणवीसांचे सचिव

अत्यंत प्रामाणिक व कार्यक्षम सनदी अधिकाऱ्याची साथ फडणवीसांना सोडवेना

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःनव्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (ता.५)काल झाला.त्यानंतर शुक्रवारी (ता.६) लगेचच या सरकारने पहिली मोठी बदली केली.अत्यंत प्रामाणिक ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून करण्यात आली.त्यांच्या नेमणुकीतून आपला कारभार कसा राहणार आहे,याची चुणूक नव्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे.

डॉ.परदेशी हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव म्हणून आतापर्यंत काम पाहत होते.२०२२ ला महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार जाऊन महायुतीचे ते येताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ.परदेशींना आपले सचिव म्हणून १२ जुलै २०२२ ला लगेच घेतले.तेथूनच ते आता पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांकडेच सचिव म्हणून आले आहेत.२००१ च्या आयएएस बॅचचे ते अधिकारी आहेत. जेथे नियुक्ती होईल तेथे आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कारकिर्द गाजली.यवतमाळ,कोल्हापूर,अकोला इथेही त्यांनी असेच काम केले. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आलेले आहे.जलसंधारणावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

२३ मे २०१२ रोजी परदेशी यांची पिंपरींचे आयुक्त म्हणून बदली झाली तेव्हा शहरात अनधिकृत बांधकामाचा सुकाळ होता. मात्र,अल्पावधीतच त्यांनी त्याविरुद्ध धडक कारवाई कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तसेच कुणाचाही दबाव न घेता केली. त्यांच्या पावणेदोन वर्षाच्या कारकिर्दीत शहरात एका विटेचे सुद्धा अनधिकृत बांधकाम कऱण्याचे धाडस कोणी केले नाही. उलट त्यांनी हजारो बेकायदेशीर बांधकामे बुलडोझर लावून कुणाचाही मुलाहिजा न ठेवता जमीनदोस्त केली.अनधिकृत बांधकामाचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ही कारकिर्द गाजली.पिंपरी महापालिकेचे ते पहिले आयुक्त होते, ज्यांच्या काळात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला.त्यातून त्यांची डिमॉलिशन मॅन अशी प्रतिमा तयार झाली होती.

डॉ.परदेशींचा कामाचा धडाकाच त्यांच्या मुदतपूर्व बदलीला कारणीभूत ठरला. १० फेब्रुवारी २०१४ रोजी राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक म्हणून त्यांनी पुण्यात पावणेदोन वर्षातच मुदतपूर्व बदली करण्यात आली.ती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली, असा आरोप त्यावेळी झाला.ती रद्द होण्यासाठी पिंपरी-चिंचवडकर रस्त्यावर उतरले.मात्र,अशा कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज राज्यात इतरत्रही आहे,असे कारण पवार यांनी त्यावेळी परदेशींच्या बदलीसंदर्भात दिले. नोंदणी महानिरीक्षक असताना पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे होता. प्रभारी पदभार असूनही त्यांनी डबघाईस असलेल्या बेशिस्त पीपएमपीएमएलला शिस्त लावली होती.नोंदणी महानिरीक्षक असतानाच त्यांची २०१५ ला बदली पीएमओत झाली.तेथेही आपल्या कामाचा ठसा उमटविल्याने त्यांना सचिव पदावर बढती मिळाली.

खासगी कामासाठी डॉ.परदेशी सरकारी मोटारीचा कटाक्षाने टाळतात.ते पिंपरीत असतानाही दिसून आले.रजेवर असताना ते गावी आरामबसने जात होते. हेडमास्टर अशीच त्यांची प्रतिमा महापालिकेत होती. गणवेष आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी तो सक्तीचा केला होता.अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा दरारा होता. त्यांच्या कालावधीत पालिका कारभारच नाही,तर वाकड्यातील काही अधिकारी व कर्मचारी सुद्धा सुतासारखे सरळ झाले होते. पिंपरीतील महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय हे चौथ्या मजल्यावर आहे. फिटेनेसविषयी खूप जागरूक असलेले डॉ. परदेशी हे कार्यालयात येताना वा जाताना कधीही लिफ्टचा वापर करीत नव्हते.चार मजले जिन्याने ते जात व उतरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *