मुंबईतील विशेष अधिवेशनात आमदार शपथविधी व अध्यक्ष निवड

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणारे खरे कामकाज

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आली.त्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी काल झाला.तर, उद्यापासून मुंबईत राज्य विधीमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होत आहे. त्यात पहिल्या दोन दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी,तर अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.त्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला १६ तारखेपासून हिवाळी अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.

दरम्यान, हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे मुंबईतील जेष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांची आज निवड झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.त्यात एरव्ही अधिवेशन बंद असते त्या शनिवार व रविवारीही काम होणार आहे.या दोन्ही दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल.तर,अखेरच्य़ा दिवशी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाचे सूप वाजेल.

१६ तारखेपासून नागपुरात अधिवेशन होणार आहे.पण, त्याला सामोरे जाण्यासाठी मंत्रीमंडळ विस्तार केला जाईल. कारण सध्या फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत.मंत्रीमंडळ करताना गेल्या टर्ममध्ये वादग्रस्त ठरलेल्या शिंदे आणि अजितदादांच्या काही मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान, गेल्या मंत्रीमंडळातील सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीच काय तो फक्त प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास मंत्रीपद घेण्यास नकार दिल्याचे समजते.त्यामुळे त्यांच्या जागी कुणाची व त्यातही ती पुणे जिल्ह्यातील आमदाराची वर्णी लागते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दुसरीकडे युतीतील तिन्ही पक्षांच्या काही आमदारांनी मंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यातूच कोणाला लॉटरी लागते हे येत्या आठ दिवसांत कळणार आहे.मंत्र्यांचे गत वेळचे प्रगतीपुस्तक पाहून आता संधी दिली जाणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने काही जुन्या मंत्र्यांचे धाबे दणाणले आहे.दुसरीकडे पिंपरी-चिंचवडचे मंत्रीपदाचे खाते पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात उघडते की कसे याकडे शहराचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शहरातील तिन्ही आमदारांनी आपापल्या परीने फिल्डींग लावली आहे.