उद्योगनगरीला पहिल्यांदा मंत्रीपद मिळणार?
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःअखेर निकालानंतर बारा दिवसांनी महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येत आहे.विविध आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील आझाद मैदानावर परवा (ता.५) नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होत आहे.मुख्यमंत्री कोण यावरून घोडे अडल्याने विधानसभेची मुदत संपून नऊ दिवस झाले,तरी नवे सभागृह अस्तित्वात आले नव्हते व नवे मंत्रीमंडळही स्थापन झाले नव्हते.
नव्या मंत्रीमंडळात जुने,अनुभवी मंत्री रिपिट होणार आहेत.मात्र,त्याबरोबरच काही नव्या चेहऱ्यांनाही त्यात संधी मिळणार असल्याचे समजते.तसेच राज्यातील सर्व प्रदेश आणि जातीधर्मांचे सोशल इंजिनिअरिंग त्यात करण्याचा प्रयत्न महायुतीचा असणार आहे.त्यात यावेळी,तरी आपले मंत्रीपदाचे खाते उघडेल, संधी मिळेल,अशी आशा पिंपरी-चिंचवडकरांना आहे.तर, ते दुसऱ्यांदा मिळेल,असा ठामा दावा मावळकरांनी केला आहे. दुसरीकडे मंत्रीपदासाठी राज्यभरातील आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे.त्यात कोणाला यश येते हे परवाच कळणार आहे.
गेल्या महिन्यात २३ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल आला. त्यानंतर लगेच दोन-तीन दिवसांत नवे सरकार स्थापन होण्याची गरज होती. कारण २६ तारखेला विधानसभेची मुदत संपत होती. पण, महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रुसवेफुगवे झाल्याने विधानसभेची मुदत संपल्यानंतरही नवे सभागृह अस्तिवात आले नाही. नवे मंत्रीमंडळही स्थापन झाले नाही.अखेर १२ दिवसानंतर परवा नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होतो आहे.त्यात आतापर्यंत संधी न मिळालेल्या उद्योगनगरीतीला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.त्यासाठी पिंपरीतून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव घेतले जात आहे. ते या मतदारसंघाचे पहिले म्हणजे २००९ ला आमदार होते. त्यानंतर २०१९ आणि आता २०२४ असे तीन टर्म आमदार असल्याने ज्येष्ठ म्हणून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनीही मंत्रीपदासाठी दावा केला आहे.त्यासाठी त्यांच्या पक्षाने,तर ठरावच करून तो अजित पवारांना दिलेला आहे.यावेळी त्यांनी विजय मोठ्या संघर्षातून खेचून आणला. पक्षातच नाही,तर युतीतूनही त्यांना मोठा विरोध होता, युतीत बंडखोरी झाली,पण,त्यावर हुषारीने त्यांनी मार्ग काढत विजय मिळवला.आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी बूस्टर डोस म्हणून अण्णांना दादा हे मंत्री करतील,असा अंदाज आहे.
दुसरे मंत्रीपदाचे मोठे दावेदार अण्णा हे मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके हे ही अजितदादांचे कट्टर पाठीराखे आहेत. त्यांनी,तर लाखापेक्षा अधिक लीडने विजय मिळवत मावळात यावेळी रेकॉर्ड केला.त्यांचे मताधिक्य हे अजित पवारांपेक्षा सुद्धा जास्त आहे.गेल्या पाच वर्षात कामाचा डोंगर उभा करीत मावळला त्यांनी पर्यटननगरी केल्याने ते दुसऱ्यांदा दणदणीत विजयी झाले.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे त्यांनी एकट्याने संघर्ष करीत झाडून साऱ्या विरोधकांवर मात केली.युतीतील भाजपही त्यांच्या विरोधात होती.त्यांचे माजी मंत्री बाळा भेगडे हे समर्थकांसह अपक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या पाठी उभे होते. तरीही शेळकेंनी रेकॉर्डब्रेक विजय मिळवला.त्यातून त्यांचा मंत्री म्हणून क्लेम अधिक घट्ट झाला.त्यात अजितदादांचे ते खंदे समर्थक असून त्यासाठी त्यांनी भल्याभल्यांना आपल्या अंगावर घेतले आहे.त्यामुळे नवीन चेहरा म्हणून त्यांचा मंत्री म्हणून विचार होऊ शकतो.
पिंपरी व मावळच्या दोन अण्णांचा मंत्रीपदासाठी विचार होत असताना ते मिळणार असा शब्द देण्यात आलेले खेडचे अजित पवारांचेच दिलीप मोहिते-पाटील या तिसऱ्या अण्णाचा,मात्र पराभव झाला.शेळके व मोहिते हे त्यांच्या कार्यकर्त्यांत अण्णा म्हणून परिचित आहेत. गेल्यावेळीच आपल्याला मंत्री करतील,अशी मोहितेंना आशा होती. पण, ती संधी मोठ्या राजकीय उलथापालथीने गेली.त्यामुळे ते नाराजही झाले.पण,राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजितदादांच्या पाठी उभे राहिल्याने यावेळी त्यांना मंत्री करु,असा शब्द त्यांना देण्यात आला होता. ते सुद्धा पिंपरीच्या अण्णासारखेच २००९ ला आमदार झाले.पण, दोघेही २०१४ ला पराभूत झाले.२०१९ ला पुन्हा निवडून आले.मात्र,२०२४ ला पिंपरीचे अण्णा पुन्हा निवडून आले,तर खे़डच्या अण्णांचा पराजय झाला. त्यामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी गेली.मात्र,ती पिंपरी,मावळच्या अण्णांना चालून आली आहे. ती त्यांना मिळणार का हे दोन दिवसांतच कळणार आहे.

