मंत्रीकन्या पूर्वा वळसे-पाटील यांना राजकारण का नकोसे वाटू लागलंय?
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःनुकत्याच झालेल्या विधानसभेला आंबेगाव-शिरुर मतदारसंघातून महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील हे सलग आठव्यांदा निवडून आले.त्यांनी आघाडीतील राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा १,५२३ मतांनी पराभव केला.पराभवानंतर निकमांनी घेतलेल्या मतदार आभार मेळाव्यात करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे विजीयी होऊनही वळसेंचा गट त्यातही त्यांच्या कन्या पूर्वा या खूपच दुखावल्या गेल्या. का ते जाणून घेऊयात.
श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान,नागापूर (ता.आंबेगाव) येथे २८ नोव्हेंबरला हा मेळावा झाला.त्यात काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात वळसे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याचे पडसाद उमटले.त्याबद्दल वळसेंच्या कन्या पूर्वा यांनी,तर फेसबुकवर खंत व्यक्त केली. आपल्या वडिलांप्रमाणे विरोधकांवर शिवराळ,आक्षेपार्ह टीका न करता त्यांनी शालीन भाषेत त्यांचा समाचार घेतला. तो घेताना त्यांनी खडे बोलही सुनावले. त्यांची ही भावनिक पोस्ट जोरात व्हायरल झाली असून त्य़ावर प्रतिक्रियाही तशाच येत आहेत.सदर मेळाव्य़ात आंबेगाव-शिरुरमध्ये लवकरच आपल्याला पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागेल,असे वक्तव्य केले गेले.त्यामागे वळसेंच्या प्रकृतीचा संदर्भ आहे.काही महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला.त्यात झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती थोडी खालावलेली असते.या पार्श्वभूमीवर त्यांच्याविषयी करण्यात आलेले हे वक्तव्य अभद्र असल्याचे सांगत त्यामुळे दुखी झाल्याचे त्यांच्या मुलीने म्हटले आहे.वळसे पाटील साहेबांचा फोटो ज्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात काही दिवसांपूर्वी लावला होता तेच आज साहेबांच्या अंतासाठी प्रार्थना करीत आहेत,अशी खंत त्यांनी केली.

विरोधकांच्या मेळाव्यातील या विधानावर काय बोलावे सुचत नाही.असे पूर्वा म्हणतात. तुम्ही नक्की निवडणुका लढा, जिंका, त्यात हरकत असण्याचे काही कारण नाही परंतु या सर्व गोष्टी करत असताना उन्माद किती असावा? सत्ता मिळवण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत? शत्रुत्व करण्याच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का? सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का ? तालुक्यात पस्तीस वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का? ज्या आदरणीय साहेबांनी आम्हाला कुटुंब म्हणून नेहमी कमी वेळ दिला परंतु या तालुक्यातील जनतेसाठी ते अहोरात्र उपलब्ध राहिले त्यांच्या मरणाची वाट पाहेपर्यंत काही लोकांची या तालुक्यात मजल गेली आहे का? आणि त्याच जोरावर काही लोक आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत का ? भविष्यात यांच्यासारख्याच लोकांना आपला सुसंस्कृत तालुका आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार आहे का? ज्यांनी तुम्हाला मोठे केले घडवले त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असे विचार आहेत का? कृतघ्नपणाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही मरणाची कामना करणार का? माणूस आणि माणुसकीला काहीच किंमत उरली नाही का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले. असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण असे वाटू लागले आहे,असे पूर्वा यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

