किरण वाजगे,कार्यकारी संपादक
नारायणगाव -जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात धना मेथी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जुन्नर बाजार समितीच्या वतीने लेखी निवेदन देऊन नारायणगाव पोलीसांकडे करण्यात आली आहे .
नारायणगाव येथील उपबाजार आवारात धना मेथी व्यापारी गणेश एरंडे रा. खेड ता. खेड, जि. पुणे यांच्यावर दि. २४ रोजी रात्री ८. २० वा सुमारास धना मेथी शेतमालाची खरेदी विक्री सुरु असताना एका अनोळखी व्यक्तीने व्यापारी गणेश एरंडे यांच्यावर लोखंडी शस्त्राने प्राणघातक हल्ला करून पळून गेला . या हल्ल्यात गणेश एरंडे गंभीर दुखापत झाली आहे . त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे ,प्रियांका शेळके ,बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे ,उपसचिव शरद धोंगडे ,चेतन रुकारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांची भेट घेऊन बाजार समितीच्या वतीने निवेदन दिले आहे . कृषि उत्पन्न बाजार समिती जुन्नर संस्थेचे उपबाजार आवारनारायणगाव या ठिकाणी धना मेथी या शेतमालाचा दररोज बाजार भरत असुन बाजार आवारात हजारो शेतकरी जुन्नर तालुका व इतर तालुक्यातुन आपला टोमॅटो व धना मेथी हा शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात तसेच हा शेतमाल खरेदीसाठी जुन्नर, आंबेगाव, खेड तसेच परराज्यातुनही व्यापारी बाजार आवारात येत आहेत . काही लोक उपबाजार आवारात शेतीमाल चोरी करण्यासाठी येत असतात .अनेक वेळा शेती माल चोरून नेतात .त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांना आर्थिक नुकसान होते .यामध्ये २० ते २५ वर्ष वयातील युवक नशेमध्ये असतात.यामध्ये काही तरुण भांडणे ,मारामारी ,चोऱ्या करणारे आहेत . असे निदर्शनास आले आहे . याबाबत अनेकवेळा पोलिस स्टेशनला तक्रार देखील दिलेली आहे.त्यामुळे बाजार आवारात भितीचे वातावरण निर्माण होऊन दहशत पसरलेली आहे.

