उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःभोसरी विधानसभा मतदारसंघात युतीच्या भाजपचे महेश लांडगेंनी विजयश्री खेचून आणत आमदारकीची हॅटट्रिक केली.गेल्या दोन टर्ममध्ये केलेली कामे,त्यातून काहीअंशी बदललेला भोसरीचा चेहरामोहरा आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे महेशदादा हे भोसरीतून तिसऱ्यांदा निवडून आले.
दरम्यान, तीन वेळा आमदार झाल्याने त्यांच्या मंत्रीपदाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या टर्मलाही ता झाली होती.पण, राज्यात अचानक झालेल्या मोठ्या राजकीय घडामोड़ीमुळे त्यांची ही संधी हुकली.परिणामी शहराचाही या पदाचा बॅकलॉग तसाच राहिला.आता तो पुन्हा भरून निघण्याची नामी संधी चालून आली आहे.लांडगेच नाही,तर शहरातून विजयी झालेले युतीचे दोन आमदार म्हणजे पिंपरीचे अण्णा बनसोडे,चिंचवडचे शंकर जगताप यांचीही नावे यासाठी त्यांच्या विजयानंतर घेतली जाऊ लागली आहेत.
लांडगेंचे प्रतिस्पर्धी आघाडीतील राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे हे आमदाकीच्या निवडणुकीत तुलनेने कमी अनुभवी होते.त्यांनी यापूर्वी एकदाही ही निवडणूक लढविलेली नव्हती. तर, दुसरीकडे लांडगेंची ती तिसरी वेळ होती.त्यामुळे त्यांच्याकडे या निवडणुकीचे सगळे नेटवर्क तयार होते. गेल्या दहा वर्षात त्यांनी उभे केलेले कार्यकर्त्यांचे जाळे होते. त्याचा मोठा लाभ त्यांना झाला.तरीही या पैलवान आमदारांनी रिस्क न घेता थेट उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेतली.गव्हाणे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा भोसरीतील गावजत्रा मैदानातच होताच तेथेच त्यांनी योगीची सभा लगेच घेतली.त्यांचे बॅक ऑफिस सांभाळणाऱ्या टीमचे कष्टही कामी आले. मतदारसंघाच्या ग्रामीण भागाने त्यांना चांगलाच हात दिला.केलेल्या कामाची लगेच प्रसिद्धी घेण्याच्या त्यांच्या प्रसिद्धी विभागाच्या यंत्रणेचाही हातभार लागला.कोरोना काळातच नाही,तर इतर वेळीही सर्वांनाच मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावाचाही त्यांना मोठा फायदा झाला.परिणामी शरद पवार,स्थानिक खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मोठा जोर लावूनही त्याचा काहीच उपयोग भोसरीत झाला नाही.