मतमोजणीसाठी शहर पोलिस दक्ष,हरियाणा पोलिसांची घेतली मदत

प्रतिनिधी
पिंपरीःउद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी निवडणूक आयोगाने आजच केली.त्यात शहर पोलिसांनीही आपला वाटा उचलला. मतमोजणी बंदोबस्तासाठी त्यांनी निमलष्करी दलाबरोबर हरियाणा पोलिसांचीही मदत घेतली आहे.तसेच मतमोजणी होणाऱ्या ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत ती संपेपर्यंत त्यांनी बदल केला आहे.

मतदानाच्या दिवशीही हरियाणा पोलिसांसह निमलष्करी दल उद्योगनगरीत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.त्यांची पुन्हा मदत उद्या घेतली जाणार आहे. राज्य राखीव दल (एसआरपी)आणि हरियाणा पोलिसांची एकेक,तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) चार तुकड्या मतमोजणी बंदोबस्तासाठी असणार आहेत.त्याजोडीने एकेक पोलिस सहआयुक्त,अतिरिक्त आयुक्त,चार पोलिस उपायुक्त,पाच सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी),२९ पोलिस निरीक्षक (पीआय),६४ सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय),पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि ६५६ पोलिस कर्मचारीही दक्ष आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातच थेरगाव येथे,तर शहरातील भोसरी आणि पिंपरीची ती बालेवाडीत होणार आहे. जुन्नर,आंबेगाव,खेड-आळंदी,शिरुर,मावळची ती तालुक्याच्या ठिकाणी असणार आहे.या सर्व ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.तेथील वाहतूक वळवली गेली असून काही मार्ग बंद करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *