अखेर सायंकाळी पाचपर्यत पुणे जिल्ह्यातील मतदानाने ओलांडली पन्नाशी

सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान इंदापूर,तर सर्वात कमी ४२.७२ पिंपरीत

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःसकाळीच अपेक्षित असलेले मतदान पिंपरी.चिंचवड,भोसरीसह पुणे जिल्ह्यातही झालेच नाही.दुपारच नाही,तर मतदान संपायला एक तास राहिलेला असतानाही त्याला वेग आला नाही.त्यामुळे सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात ५४.०९ टक्के मतदान झाले.ते सर्वात कमी ४२.७२ टक्के पिंपरीत झाले.त्यामुळे आणखी तासाभरात ते समाधानकारक होईल की नाही,याविषयी शंका निर्माण झाली आहे.

कडक उन्हाळ्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा हिवाळ्यात विधानसभेला मतदान खूप जास्त होईल,असा अंदाज होता.पण,तो खोटा ठरण्याचीच चिन्हे आहेत.उद्योगनगरीतील तीनपैकी चिंचवड हा सर्वाधिक मोठा मतदारसंघ असूनही तेथे तुलनेने तेवढे मतदान (५०.०१ टक्के)झाले नाही. उलट,त्यापेक्षा मतदार संख्येत लहान असलेल्या भोसरीने बाजी मारली.तेथे ५५.०८ टक्के मतदान झाले.जिल्ह्यात पाचपर्यंत मतदान टक्केवारीत इंदापूर सर्वात पुढे (६४.५०)राहिला.त्यानंतर मावळने (६४.४४)बाजी मारली.आंबेगाव तिसऱ्या नंबरवर (६३.८७) राहिला.जुन्नरला ६२.१२,खेड-आळंदीत ६१.५७,तर शिरुरमध्ये ते ५८.९० टक्के झाले.

तरुणाईनेच काहीशी पाठ फिरवल्यामुळे अपेक्षित मतदान झाले नसल्याचे समजले.त्याला काही ठिकाणी बिघ़डलेल्या मतदानयंत्रांची जोड मिळाली.निवडणूक आयोग मतदान वाढविण्याच्या प्रयत्नात कमी पडल्याचे दिसले.प्रमुख राजकीय पक्ष,त्यांचे उमेदवार आणि कार्यकर्ते यांना मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यातही अपयश आले.एकूणच या सर्व कारणांचा फटका अपेक्षित मतदान न होण्यात झाले.काही ठिकाणी वैध ओळख असूनही मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले.कष्टकरी नेते बाबा कांबळे यांच्याबाबतीत हा प्रकार पिंपरीत घडला.त्यांच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड असूनही त्यांना मतदान करू न देता मतदान केंद्राबाहेर काढण्यात आले.त्याची दखल आपला आवाजने घेतली.त्याबाबत लगेच बातमी दिली.दरम्यान,कांबळेंनी झाला प्रकार लाईव्ह केला.परिणामी पिंपरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव,जनसंपर्क अधिकारी प्रफूल्ल पुराणिक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्या सहकार्यामुळे मतदान संपायला काही अवधी राहिला असताना कांबळेंना अखेर आपला मतदानाचा हक्क बजावता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *